– बोधेगाव येथे वंजारी समाजाचे रस्ता रोको आंदोलन
– मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही – बाळासाहेब सानप
नगर/शेवगाव (बाळासाहेब खेडकर) – वंजारी समाजास अनुसूचित जमाती प्रवर्गातील एस टी आरक्षण शासनाने तात्काळ मंजूर करून स्वतंत्र महामंडळ स्थापन केल्याशिवाय मागे हटणार नाही. त्यासाठी वेळप्रसंगी वाटेल ती किंमत मोजून राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा जय भगवान संघाचे अध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिला. शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी आश्वासन दिल्यानंतर दोन तासांनी पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले.
वंजारी समाजास अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील आरक्षण तात्काळ प्रदान करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करून तातडीने मंजूर करून, वंजारी समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करून, शासनाने स्वतंत्र समिती नेमून कार्यवाही करावी हैद्राबाद, कर्नाटक व बीड गॅझेट त्वरित लागू करून वंजारी समाजास सरसकट अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा. या प्रमुख मागणीसाठी परमेश्वर जालिंदर केदार, अभिजित अजिनाथ गिते आणि युबराज नवनाथ जवरे यांनी दि.१ ऑक्टोबरपासून वाडगाव (थाटे), ता. शेवगाव येथे आमरण उपोषण पुकारण्यात आले आहे. आज सातव्या दिवशी उपोषण सुरू आहे. प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे उपोषणकर्त्यांस पाठिंबा देण्यासाठी आज (दि.७) सकाळी दहा वाजता बोधेगाव येथे लोकनेते गोपीनाथ मुंडे चौकात शेवगाव- गेवराई राज्य मार्गावर भव्य रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले होते. शेवगावचे तहसीलदार आकाश दहाडदे यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपल्या मागण्या व भावना वरिष्ठांकडे कळविण्यात येईल, असे ठोस आश्वासन दिल्यानंतर पुकारलेले आंदोलन मागे घेण्यात आले. शेवगावचे पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी चौक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आंदोलनामुळे शेवगाव- गेवराई राज्यमार्गावर तीन तास वाहतूक ठप्प झाली होती. दोन्ही बाजूने लांब लचक मोठ्या रांगा लागल्या होत्या. यावेळी आंदोलकांनी वंजारी समाजाच्या आरक्षण काढण्याची मागणी करणार्यांचा चांगला समाचार घेतला. भविष्यात जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय झाला. आंदोलनात यावेळी, माणिक गर्जे, गंगाधर खेडकर, शरद सोनवणे, रामजी अंधारे, बाळासाहेब शिरसाट बाळासाहेब वाघ, नितीन फुंदे, संदीप फुंदे, समता परिषदेचे संगीता ढवळे, सरपंच शीतल केदार, महादेव जवरे, अशोक ढाकणे, छाया जवरे, बटूळे बाबा, राजेंद्र दौंड, अरुण मुंडे, बाळासाहेब सानप यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी समाजाचे विविध राजकीय पक्षातील पदाधिकारी, महिला, ग्रामस्थ हजारोच्या संख्येने भरउन्हात सहभागी झाले होते. सूत्रसंचालन हभप ज्ञानेश्वर बटूळें यांनी केले. आभार डॉ दराडे यांनी मानले.
राज्यभर आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी आज (दि.७) थाटे वाडगाव येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आयोजनाची यावेळी दिली असून, समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.