– बस वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली; जडवाहतूक जुन्या पुलावरून सुरू, अपघाताचा धोका!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णा धरणातून दि. २८ सप्टेंबररोजी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आले. त्याचा फटका सिंदखेडराजा – मेहकर मार्गावरील नागपूर डाक लाईनवरील राहेरी येथील नव्या पुलाला बसला असून, पुलाच्या दोन्ही बाजूंचा कच्चा भराव पूर्णपणे वाहून गेला आहे. या दुर्घटनेमुळे वाहतूक विस्कळीत झाली असून, एस.टी. बससेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. दरम्यान, जड वाहनांची वाहतूक जुन्या पुलावरून सुरू असल्याने भीषण अपघाताचा धोका कायम आहे. दरम्यान, या पुलाची पाहणी आमदार मनोज कायंदे यांनी केली असून, तातडीने भराव टाकून पुल दुरूस्त करण्याच्या सूचना त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिल्या आहेत.
भराव वाहून गेल्याच्या घटनेनंतर उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाला तात्काळ पुल दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र या आदेशांकडे विभागाने थाटात दुर्लक्ष केल्याने जनतेत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ‘दररोज जुन्या पुलावरून शेकडो वाहनं जीव मुठीत धरून जात आहेत, पण प्रशासन मात्र झोपेत आहे!’ असा संतप्त स्वर स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला आहे. या घटनेला तब्बल सात दिवस उलटल्यानंतर मातृतीर्थ सिंदखेडराजाचे कर्तव्यदक्ष आमदार, कामदार मनोज कायदे यांनी आज म्हणजे ५ ऑक्टोबररोजी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. स्थानिक नागरिक व प्रवाशांनी पुलाची दयनीय अवस्था आमदारांना दाखवून दिली. ‘सात दिवस जीर्ण झालेल्या पुलावरून जड वाहने चालत होती, एखादा अपघात झाला असता तर जबाबदार कोण?’ असा प्रश्न स्थानिक जनता करीत आहे. स्थानिक प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग विभागामधील संवादाचा अभाव व जबाबदारी टाळण्याची प्रवृत्ती यामुळे परिस्थिती अधिक बिकट बनली आहे. पुलाची तातडीने दुरुस्ती न झाल्यास वाहतूक अपघाताचा मोठा धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. येथील स्थानिक नागरिकांनी सांगितले की, ‘पुलावर सतत जड वाहतूक सुरू आहे. भराव गेलेला असून फक्त थरकाप उडवणारे खड्डे उरले आहेत. विभागाकडून ना तपासणी, ना दुरुस्ती. हा प्रकार म्हणजे थेट जनतेच्या जीवाशी खेळ आहे.’
आज रोजी दिवाळीचा मोठा सण तोंडावर आला असताना, राहेरी पुलाचा भराव वाहून गेल्याने एस.टी. बससेवा पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे. यामुळे दिवाळीनिमित्त गावाकडे परतणार्या चाकरमान्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. लांब व खराब पर्यायी मार्गामुळे प्रवासाचा वेळ वाढला असून, प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. दरम्यान, सदर पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, या कामास जबाबदार ठेकेदार व राष्ट्रीय महामार्ग अधिकार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी परिसरातील जनतेने केली आहे. ‘पुलाचे काम नीट झाले असते तर आज चाकरमान्यांना या सणासुदीच्या काळात त्रास सहन करावा लागला नसता,’ अशी प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. राहेरी पुलाच्या निकृष्ट कामाबद्दल चौकशी व दोषींवर कारवाईची मागणी आता चव्हाट्यावर आली असून, ग्रामस्थांनी दुरुस्ती तातडीने व्हावी यासाठी प्रशासनाला इशारा दिला आहे.