– शेतकर्यांना दिलासा : निमगाव वायाळ येथे पार पडली विशेष सभा
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील दुसरबीड मंडळातील निमगाव वायाळ ग्रामपंचायत कार्यालयात महसूल सेवा पंधरवडा अंतर्गत आज, दि.२५ सप्टेंबररोजी विशेष सभा पार पडली. या सभेत शेतकर्यांच्या शेतीकडे जाणार्या रस्त्यांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी ‘पाणंद रस्ते, शिव रस्ते विषयक विशेष मोहीम’ हाती घेण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
सभेत नोंदीत असलेले पाणंद रस्ते दाखल करून अधिकृत करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. तसेच शेतकर्यांच्या संमतीपत्राच्या आधारे नवीन रस्त्यांना मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रलंबित प्रकरणांना गती देण्यासाठी ‘रस्ता अदालत’ आयोजित करण्याचे नियोजन असून त्यामुळे वादग्रस्त रस्ते प्रश्न कायमचे मिटणार आहेत. या उपक्रमामुळे शेतकर्यांना त्यांच्या शेतीवर जाण्यासाठी कायदेशीर, निर्विवाद आणि नोंदीत असलेले मार्ग मिळणार आहेत. शेतीकडे वेळेत पोहोचण्यासाठी हा निर्णय क्रांतिकारक ठरेल, असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे. विशेष सभा पार पडल्यानंतर सिंदखेडराजा तहसीलदार अजित दिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवार फेरी आयोजित करण्यात आली. या शिवार सभेला ग्रामसेवक शिंगणे, माजी सरपंच बद्रीनाथ निलख, डिगांबर वायाळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष रामभाऊ हुसे, रामदास हुसे,राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मयुर पाटील वायाळ, सामाजिक कार्यकर्ते अनिल पाटील वायाळ, गजानन वायाळ, श्याम काकड, सुमीत जायभाये यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते.