– ‘आरोग्य शिक्षणातून सशक्तीकरण’ उपक्रम उत्साहात संपन्न
बिबी (ऋषी दंदाले) – लोणार तालुक्यातील बिबी ग्रामीण रुग्णालयात दि.२२ सप्टेंबररोजी ‘स्वस्थ नारी – सशक्त परिवार’ या अभियानाअंतर्गत किशोरवयीन मुली, महिला आणि गर्भवती स्त्रियांसाठी मार्गदर्शन व समुपदेशनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट आरोग्य, पोषण, स्वच्छता तसेच किशोरवयीन काळातील बदलांविषयी जागरूकता निर्माण करणे हे होते.
या प्रसंगी उपस्थित विद्यार्थिनींनी आपल्या मनातील शंका मांडल्या. त्यावर थेट संवाद साधून त्या शंकांचे निरसन करण्यात आले. किशोरवयीन मुलींना शारीरिक बदल, मानसिक ताणतणाव, सामाजिक अडचणी अशा विविध बाबींबद्दल चर्चा झाली. यासोबतच पोषक आहाराचे महत्त्व, शरीराला लागणारे जीवनसत्त्वे व पोषणतत्त्वे यांचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमात एनेमिया, थॅलेसेमिया, सिकल सेल डिसिज, मुख, स्तन व गर्भाशयाचा कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, क्षयरोग, लठ्ठपणा, गर्भधारणा व रजोनिवृत्ती यांसारख्या गंभीर आजारांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली. या आजारांचे लवकर निदान व योग्य उपचार याबाबतही विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.
कार्यक्रमाचे उद्घाटन सरपंच चंदाबाई गुलमोहर यांच्याहस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून महल्ले मॅडम, खेडकर मॅडम, डोईफोडे मॅडम उपस्थित होत्या. प्रमुख मार्गदर्शन डॉ. पोफळे मॅडम यांनी केले. त्यांनी किशोरवयीन मुलींसाठी आरोग्य व स्वच्छतेचे महत्त्व अधोरेखित केले. महल्ले मॅडम यांनी ‘सकस आहार व त्याची गरज’ या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. अधिपरिचारिका शिला हिवाळे यांनीही विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक सूचना दिल्या, तर आयसीटीसी विभागाचे शेगोकार साहेब यांनी एचआयव्ही जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर माहिती दिली. यावेळी सरपंच चंदाबाई गुलमोहर यांनी ग्रामपंचायतीच्यावतीने आरोग्य विभागाच्या कार्याचे कौतुक केले. गावागावांत आरोग्यविषयक जनजागृती पोहोचविण्यासाठी आरोग्य विभागाने घेतलेला पुढाकार व सातत्यपूर्ण काम समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे त्या म्हणाल्या. या कार्यक्रमाला स्थानिक ग्रामस्थ, महिला तसेच किशोरवयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कृष्णा पंधे यांनी केले.
बिबी ग्रामीण रुग्णालयाच्या या उपक्रमामुळे समाजात आरोग्याबाबत सकारात्मक वातावरण तयार झाले असून महिला व तरुण पिढी अधिक सक्षम, निरोगी व आत्मनिर्भर होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.