पैठण (तालुका प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील हिरापूर येथे देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सव कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद मिळाला. येथील ग्रामपंचायतीने पूर्वापार चालत आलेल्या पारंपारिक, जुन्या प्रथा, परंपरेला मागे टोकत सुसंस्कृत आचार विचारांना जन्म देत गरीब, होतकरू विधवा महिला यशोदा रमेश लेंडे यांच्या हस्ते ग्राम पंचायतीच्या झेंड्याचे ध्वजारोहण केले. आणि हा आदर्श इतरांसमोर ठेवला. राज्यात या आधी देखील अनेक ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विधवांना मान सन्मान मिळाला आहे. ग्रामपंचायतच्या ध्वजारोहणासाठी विधवा महिलेची केलेली निवड यामुळे पैठण तालुक्यातील हिरापुर ग्रामपंचायतचे सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे.
देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला असून, घर घर तिरंगा हर घर तिरंगा फडकवण्याचे आवाहन भारत सरकार यांच्या वतीने देशवासीयांना करण्यात आले होते. या आवाहनाला ग्रामीण भागाबरोबर सर्वत्र भरभरून प्रतिसाद मिळाला. देशाची अस्मिता आणि शान असलेला तिरंगी झेंडा फडकविण्यासाठी जनतेत उत्साह जाणवला दिनांक १३ ते १५ या तीन दिवसात हा अमृत महोत्सव देशात विविध उपक्रमांनी सुरु हाेता. हिरापुर गावातील सरपंच व प्रतिष्ठीत नागरीकांनी गरीब होतकरू महिला यशोदा लेंडे यांची निवड करत दिनांक १४ ऑगस्ट या दिवशी ध्वजारोहणाचा मान देण्याचे ठरवले. त्याला सर्व ग्रामस्थांनी प्रतिसाद दिला. त्यांच्याकडून ग्रामपंचायतच्या तिरंगी झंड्याचे ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमास सरपंच इंदुबाई लेंडे, ग्रामसेवक रामप्रसाद मापारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी स्टाफ सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी उपस्थित होते.