– गाय कापल्याच्या संशयावरून आ. संग्राम जगताप, आ. विक्रम पाचपुतेंनी नगर-पुणे मार्गावर केला होता रस्ता रोको!
– अवघ्या सहा तासांच्याआत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला आरोपी जेरबंद; शहरातील तणाव निवळला!
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) – गोवंशीय जनावराचे मुंडके व मांस कोठला बसथांब्यासमोर आढळून आल्याने व गाई कापल्या गेल्याच्या संशयाने शहरात तणाव निर्माण झाला होता. नगरचे आमदार संग्राम जगताप व श्रीगोंद्याचे आमदार विक्रम पाचपुते यांनी नगर-पुणे महामार्गावर रस्ता रोको करून आरोपीला तातडीने जेरबंद करण्याची, गोवंशीय जनावरांची हत्या रोखण्याची तसेच अवैध कत्तलखाने बंद करण्याची मागणी केली होती. शहरातील तणावाचे वातावरण पाहाता, स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या शिताफीने तपास करत अवघ्या सहा तासांत या गुन्ह्याची उकल केली व आरोपी तरबेज आबीद कुरेशी (वय २४) रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट याच्या मुसक्या आवळल्या. काही विधिसंघर्षित बालकांचीही चौकशी करण्यात आली.

सविस्तर असे, की भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते. या गुन्ह्यातील आरोपीची माहिती काढत असतांना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी तात्काळ घटनेचे गांभीर्य ध्यानात घेवून पोलिस हेड कॉन्स्टेबल दीपक घाटकर, सुनील पवार, गणेश धोत्रे, शाहीद शेख, फुरखान शेख, पोलिस नाईक भीमराज खर्से, पोकॉ सतिष भवर, पोकॉ योगेश कर्डीले, पोकॉ प्रशांत राठोड, मपोहेकॉ भाग्यश्री भिटे, मपोकॉ छाया माळी यांना तात्काळ आरोपीची माहिती घेवून अटक करण्याबाबत आदेशित केले. त्यासाठी वेगवेगळी पथके तयार करून रवाना केलीत. व्यावसायिक कौशल्याचा वापर करुन तसेच गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती प्रमाणे गुन्ह्याच्या ठिकाणी वापरलेली मोपेड गाडी व त्यावरील दोघांचा शोध घेतला असता, सदरची गाडी ही आरोपी तरबेज आबीद कुरेशी, वय २४ वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर याच्या ताब्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्याचा शोध घेतला असता, तो मिळून आला. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने सांगितले की, त्यांने दोन बैल गोवंश यांची राहते घरी कत्तल करून, त्याचे मांस विक्री केले आहे. सदर कत्तल केल्यानंतर कत्तलीतील वेस्ट मांस व अवशेष हे फेकून देण्याकरिता ओळखीचे दोन विधीसंघर्षीत बालक यांना मोपेड गाडी देवून त्यांना त्या कामाच्या बदल्यात पैसे दिले.

सदर वेस्ट मांस व अवशेष हे त्यांनी कोठला बसस्थानक रोडकडेला फेकून दिले. या गुन्ह्यात आरोपी कुरेशीकडून वापरलेली मोपेड गाडी ताब्यात घेण्यात आली असून, विनानंबरची जुनी वापरती मोपेड गाडी ४० हजार रूपयांची असा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांच्या ताब्यातील आरोपी तरबेज आबीद कुरेशी, वय २४ वर्षे, रा. व्यापारी मोहल्ला, झेंडीगेट, ता. जि. अहिल्यानगर आणि विना नंबरची जुनी वापरती मोपेड गाडी रूपये ४० हजार किमंतीचा मुद्देमाल गुन्ह्याच्या तपासकामी भिंगार कॅम्प पोलिस ठाणे येथे हजर करण्यात आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास भिंगार कॅम्प पोलिस करीत आहेत. ही कारवाई सोमनाथ घार्गे पोलिस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलिस अधीक्षक, अहिल्यानगर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे. सहा तासांच्याआत आरोपी जेरबंद करून व या गंभीर गुन्ह्याची उकल झाल्याने शहरातील तणाव निवळला आहे.