– शहरातील बाबू लॉज चौकातील घटना; पूर्ववैमनस्यातून दोन गट भिडले!
– चिखली पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा खूनखराबा टळला!
चिखली (राजेश लोखंडे) – शहरातील बाबुलॉज चौकात काल, दि.१० सप्टेंबरच्या संध्याकाळी दोन गटातील जुन्या वैमनस्यातून झालेल्या हाणामारीमुळे शहरातील वातावरण तणावग्रस्त झाले होते. दोन प्रभावशाली सामाजिक कार्यकर्त्यांचे नातेवाईक आणि त्यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात १० ते १२ जण जखमी झाले असून, त्यांच्यावर रूग्णालयात वैद्यकीय उपचार सुरू आहेत. पोलिसांनी वेळीच धाव घेतल्याने मोठा खूनखराबा टळला होता.
भाईजान ग्रूपचे अध्यक्ष उबेद अली खान उर्फ भाईजान आणि हाजी निसार कुरेशी या दोन कुटुंबातील जुन्या वैमनस्याचा काल उद्रेक झाला. बाबू लॉज चौकात असलेल्या हाजी निसार सेठ यांच्या पानमसाला दुकानावर मोठा जमाव धडकला आणि दोन्ही गटात तुफान हाणामारी सुरू झाली. या संघर्षात सुमारे १० ते १२ जण जखमी झालेत. या दोन कुटुंबांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून वैयक्तिक वाद आणि व्यावसायिक स्पर्धेमुळे धुसफूस सुरू होती व नेहमी यांच्यातील वाद उफाळत होता. त्याचा काल स्फोट होऊन दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली. ही माहिती स्थानिक पोलिस स्टेशनचे ठाणेदार संग्राम पाटील आणि पोलिस प्रशासनाला कळताच त्यांनी सतर्कता दाखवून जमावाला पांगवून होणारा मोठा वाद आणि हाणामारी रोखली. त्यामुळे मोठा खूनखराबा टळला. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर काही रहिवाशींच्या मते, या वादाला सामुदायिक रंग चढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, काल रात्रीपासून बाबू लॉज परिसरात पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला असून, वरिष्ठ अधिकार्यांकडून पुढील तणाव टाळण्यासाठी सूचना देण्यात आल्या आहेत. स्थानिक व्यापारी व नागरिकांनी या घटनेची तीव्र निंदा केली असून, शहरातील शांतता राखण्यासाठी दोन्ही गटांच्या नेत्यांनी पुढे येऊन मध्यस्थी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.