– नागरिकांनी घ्यावी खबरदारी! एसबीआय, पीएम किसान, लग्नपत्रिका फाईलच्या नावाखाली मोबाईल हॅकिंगचे प्रकार!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – देऊळगावराजा आणि सिंदखेडराजा तालुक्यातील विविध व्हाट्सअॅप ग्रुपमध्ये हॅकर्सने आपले जाळे पसरवले असून शेकडो मोबाईल नंबर या सापळ्यात अडकले आहेत. ‘एसबीआय एपीके फाईल’, ‘एसबीआय युनो फाईल’, ‘पीएम किसान फाईल’, ‘कॅल्क्युलेटर फाईल’, ‘ट्रिपल एक्स फाईल (स्त्रीचा फोटो असलेली)’, ‘लग्नपत्रिका फाईल’ अशा नावाने संशयास्पद फाईल्स ग्रुपमध्ये टाकल्या जात आहेत.
नागरिक अनावधानाने या फाईल्स उघडताच मोबाईल हॅक होतो. त्यानंतर हॅकर्स मोबाईल नंबरवर नियंत्रण मिळवून, त्या नंबरमधून पुढे इतर ग्रुपमध्येही अशाच फाईल्स शेअर करतात. यामुळे आणखी लोक या सापळ्यात अडकण्याची भीती आहे.
नागरिकांनी घ्यावी खबरदारी – पोलिस अधीक्षक निलेश तांबे यांचे आवाहन!
बुलढाण्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी नागरिकांना अलर्ट राहण्याचे आवाहन केले आहे. अनोळखी फाईल अथवा लिंक उघडू नये. मोबाईलमध्ये फक्त अधिकृत Play Store/App Store मधूनच अॅप्स डाउनलोड करावेत. WhatsApp वर दोन-स्तरीय सत्यापन (2-Step Verification) सुरू करावे. ग्रुपमध्ये संशयास्पद फाईल आढळल्यास ती डिलीट करून अॅडमिनला कळवावी. मोबाईल हॅक झाल्याचा संशय आल्यास WhatsApp लॉगआऊट करून पासवर्ड बदलावा, अशा सूचना जिल्हा पोलिस अधीक्षकांनी केल्या आहेत.
सायबर विभागाचा सल्ला
सायबर फसवणूक टाळण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत KYC, बँक, OTP किंवा इतर गोपनीय माहिती फोनवर शेअर करू नये, असे प्रमोद इंगळे, सहायक पोलीस निरीक्षक, सायबर विभाग यांनी सांगितले. अशा प्रकारच्या फसवणुकीबाबत तक्रार करण्यासाठी नागरिकांनी www.cybercrime.gov.in या संकेतस्थळावर किंवा 1930 या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा.