– खून की आत्महत्या?: परिसरात विविध चर्चांना उधाण
– ओळख पटविण्याचे अमडापूर पोलिसांसमोर आव्हान
चिखली (राजेश लोखंडे) – तालुक्यातील अमडापूर पोलिस ठाणेहद्दीत येणार्या उत्रादा येथे शेतातील विहिरीत एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली असून, हा प्रकार हत्या आहे की आत्महत्या, असा प्रश्न चर्चेत आला आहे. तर मृतदेहाची ओळख पटविण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.
तालुक्यातील अमडापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या उत्रादा शिवारातील शेतकरी केसरसिंग इंगळे यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी इसमाचे प्रेत पडलेले असल्याची माहिती अमडापूर पोलिसांना मिळाली असता, बीट जमादार लक्ष्मण टेकाळे यांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली असता, सदर या इसमाबद्दल कोणती माहिती आणि ओळख पटली नाही. मृत इसमाच्या अंगात निळ्या रंगाचे टी-शर्ट आणि जांभळ्या रंगाची जीन्स पॅन्ट घातलेली असून, प्रेताच्या उजव्या हातावर टॅटू आणि सुजाता तर डाव्या हाताचे दंडावर बाळाचे चित्र गोंदलेले आहे. सदर मृत इसम कोणाच्या ओळखीचा असल्यास पोलिस स्टेशन अमडापूर येथे संपर्क साधावा, असे आवाहन तपास अधिकारी सहायक फौजदार लक्ष्मण टेकाळे यांनी केले आहे. दरम्यान, या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून, विविध चर्चांना उधाण आले आहे. सदर मृतदेह परिसरातील दिसून येत नसल्याने कुणी तरी खून करून तो विहिरीत फेकला का, अशीही चर्चा परिसरातून ऐकायला येत होती. त्यामुळे मृतदेहाची ओळख पटविण्याचे अमडापूर पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.