– गावठी पिस्टल, घातक शस्त्रांसह दरोडेखोरांची टोळी मोळा रोडवरील जामगाव शिवारातून जेरबंद
– दरोडे पडण्याआधीच पोलिसांनी मुसक्या आवळल्या; भयानक कांड व दरोड्याच्या घटना टळल्या!
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – मेहकर पोलिसांच्या सतर्कतेने दरोड्याचा मोठा कट उधळला गेला असून, मोळा रोडवरील जांमगाव शिवारातील एका टिनपत्र्याच्या शेडमध्ये दबा धरून बसलेल्या संशयित दरोडेखोरांना पोलिसांनी मोठ्या शिताफीने जेरबंद केले आहे. या दरोडेखोरांकडून गावठी पिस्टलसह घातक शस्त्रे हस्त करण्यात आले असून, मेहकर परिसरात मोठा दरोडा घालण्याच्या तयारीत ही टोळी होती. या टोळीत एका महिलेचादेखील समावेश आहे. जिल्ह्यात होणारे मालमत्ताविरोधी गुन्हे पाहता, पोलिस अधीक्षक नीलेश तांबे यांनी मालमत्ताविरोधी गुन्हे करणार्या आरोपीची शोधमोहीम तसेच या आरोपीविरोधात कडक कारवाई करण्याबाबत आदेशित केले आहे. त्या अनुषंगाने मेहकर पोलिसांनी सतर्क राहून दरोड्याचा हा कट उधळून लावला आहे.
सविस्तर असे, की ३० जुलैरोजी मेहकर पोलिस ठाण्याचे ठाणेदार पोलिस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, मेहकर पोलिस ठाणेहद्दीत मोळा रोड परिसरात काही इसम दरोडा घालण्याचे हत्यारासह दबा धरून बसले आहेत. यावरून सदर माहिती पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदीप पाटील यांना देवून त्यांच्या आदेशाने व पोलीस स्टेशनच्या स्टाफच्या सहाय्याने पंचासमक्ष मिळालेल्या माहितीच्या आधारावर मोळा रोडवरील जांमगाव शिवारातील लेआउटमध्ये एका टिनपत्र्याच्या शेडमध्ये दबा धरून बसलेल्या संशयितांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून दरोडा घालण्याची घातक शस्त्रे व साहित्य जप्त केले. सदर ठिकाणाहून पोलिसांनी एकूण तीन आरोपी ताब्यात घेतले आहेत. इतर आरोपीचा पोलिस पथकासह शोध घेणे चालू आहे.
आरोपी व जप्त मुद्देमालाची माहिती व विवरण खालीलप्रमाणे. १. शेख जुनेद शेख इरफान वय २७ वर्ष व्यवसाय मजुरी रा. पैनगंगा नगर मोळा रोड मेहकर ता. मेहकर, २. निखील सिध्देश्वर सोळके वय २४ वर्ष व्यवसाय. मजुरी रा. पवनसुत नगर मेहकर ता. मेहकर, ३. श्रीमती किरण प्रदीप बळी वय ३७ वर्ष रा कोलेश्वर नगर डोणगाव ता. मेहकर या तीनही आरोपींच्या ताब्यातून २० हजार रूपयांचे एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्टल, ५० रुपये किमतीचे एक जीवंत काडतूस, एक लाकडी फळी ज्यावर एका बाजूने ठिकठिकाणी अनुकूचिदार लोखडी खिळे ठोकलेले (वाहनाचे टायर पंम्चर करण्याच्या उद्देशाने), एक हिरवी काचेची मूठ असलेला पेचकस, एक लोखंडी चाकू, एक वक्राकार जुना वापरता कोयता, एक पिवळया रंगाची ड्रिल मशीन, पिवळया रंगाची नॉयलान दोरी, ३० हजार रूपये किमतीचे तीन मोबाईल असा एकूण ५१ हजार १५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर कारवाई ही पोलीस अधीक्षक नीलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, उपविभागीय पोलीस अधिकारी मेहकर प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस स्टेशन मेहकर येथील पोलीस निरीक्षक व्यंकटेश्वर आलेवार, सहायक पोलीस निरीक्षक संदीप बिंराजे, पोलीस उपनिरीक्षक वसंत पवार, पोलीस उपनिरीक्षक गणेश कड, पोउपनि संदीप मेधने, पोउपनि नितीन मिंड, सपोउपनि सुरेश काळे, पोहेका सुखदेव ठाकरे, पोहेका लक्ष्मण कटक, पोहेका विजय बेडवाल, पोना प्रभाकर शिवणकर, पोकॉ मोहम्मद परसुवाले, पोकों इब्राहीम परसुवाले, पोकॉ राजेगावकर, चापोशि संजय पहारे , चापोशि आशिष राठोड, सलीम गवळी, पोशि गणेश वैदय, पोशि समाधान आरमाळ, मपोका आम्रपाली सरकटे यांनी सदरची कारवाई केली आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक गणेश कड व पोशि गणेश वैदय हे करीत आहेत.