– पेरण्या उखडल्या, धरणे ओव्हर फ्लो; एकजण पुराच्या पाण्यात अडकला!
– रात्रभर पावसाचा हाहाकार, मोठ्या प्रमाणात नुकसान, नदी-नाल्यांना पूर
– लोणार तालुक्यात दीड तासात २८८ मिमी पाऊस!
लोणार/बुलढाणा (वाजिद खान) – बुलढाणा जिल्ह्यात काल रात्रभर पावसाने धुमाकूळ घालून हाहाकार उडविला आहे. लोणार, मेहकर, खामगाव, शेगाव या तालुक्यांसह बुलढाणा, सिंदखेडराजा, चिखली तालुक्यांतही जोरदार पाऊस झाला. लोणार व मेहकर तालुक्यात तर ढगफुटीसदृश पाऊस झाला असून, शेकडो हेक्टरवरील शेती अक्षरशः खरडून शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. लोणार तालुक्यातील धरणे ओव्हर फ्लो झाली असून, नद्या-नाल्यांना महापूर आले आहेत. तालुक्यातील धाडजवळ नदीकाठच्या घरावर एक व्यक्ती अडकून पडला असून, त्याच्या मदतीसाठी प्रशासन पोहोचले होते. लोणार, मेहकर तालुक्यातील सर्व लघु प्रकल्प ओव्हर फ्लो झाल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. खामगाव तालुक्यातील मन प्रकल्पदेखील भरला असून, मन प्रकल्पाचे दोन दरवाजे सकाळी १० वाजता उघडून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. शेगावजवळील जवळा बुद्रूक नदीला पूर आल्याने धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून, पुराचे पाणी वाढतच चालले होते. लोणार तालुक्यात तर अवघ्या दीड तासांत 288 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.
काल रात्रीपासून खामगाव, लोणार, मेहकर, शेगाव तालुक्यांत पावसाने धुमाकूळ घातला असून, लोणार तालुक्यातील टिटवी, देऊळगाव कुंडफळ, बोरखेडी, गुंधा हे सर्व लघु पाटबंधारे तलाव ओव्हर फ्लो झाले आहेत. सांडव्याद्वारे पाण्याचा विसर्ग सुरू झाल्याने नदीकाठच्या गावांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्याने नदीनाल्यांना पूर आलेला आहे. लोणार तालुक्यातील धाड येथील एक व्यक्ती पुराच्या वेढ्यात अडकला असून, तो टीनपत्रांच्या घरावर बसून मदतीची याचना करत होता. ज्येष्ठ नेते नंदू मापारी यांनी याबाबत तातडीने प्रशासनाला कळवल्यानंतर त्याच्या मदतीसाठी प्रशासनाचे पथक पोहोचले होते. नदीकाठच्या ग्रामस्थांनी सतर्क राहून दक्षता घ्यावी, असे आवाहन मेहकर पाटबंधारे उपविभागाचे उपविभागीय अभियंता यांनी केले होते.
शेगाव, खामगाव तालुक्यांतही मुसळधार पाऊस झाला असून, जवळा बुद्रूक नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी वाढतच चालल्याने नदीकाठच्या गावांत भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. खामगाव तालुक्यातील मन प्रकल्पांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाल्याने धरण भरले असून, धरणाचे दोन दरवाजे सकाळी १० वाजता उघडले जाऊन पाण्याचा विसर्ग सोडला जाणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असा इशारा मन प्रकल्प पूरनियंत्रण कक्षाच्यावतीने देण्यात आला आहे. नदी-नाल्यांना पूर आल्याने पुराचे पाणी घरात, शेतात घुसून मोठे नुकसान झाले आहे. बुलढाणा, चिखली, सिंदखेडराजा तालुक्यांतही जोरदार पाऊस सुरू होता.