– पशुसंवर्धन विभाग अॅलर्ट! तीन लाखाच्यावर जनावरांचे लसीकरण!
– जिल्ह्यात अद्याप लक्षणे आढळली नाही!
– पशुपालकांनी घाबरू नये; उपायुक्त डॉ.दुबे यांचे आवाहन
बुलढाणा (बाळू वानखेडे) – जिल्ह्यात अज्ञात आजाराने डोके वर काढले असून, यामुळे काही जनावरे दगावल्याची माहिती आहे. यामुळे पशुपालकांना मात्र लंम्पी या आजाराची धास्ती भरली आहे. तर जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभाग देखील अॅलर्ट झाला असून, आजपर्यंत तीन लाखाच्यावर जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे. अद्याप जिल्ह्यात अशी लक्षणे आढळली नाही. याबाबतचे नमुने तपासणीसाठी संबंधित प्रयोगशाळेत पाठवले असून, पशुपालकांनी घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. हा आजार लसीकरणामुळे पूर्ण बरा होतो, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अमित कुमार दुबे यांनी केले आहे.
गेल्या तीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात लंम्पी या आजाराने हैदोस घातला होता. या आजाराने जवळजवळ अडीच हजाराच्यावर जनावरे दगावली होती. तर उपचार करता करता पशुसंवर्धन विभागाचेदेखील नाकीनऊ आले होते. आता गेल्या चार-पाच दिवसापासून जिल्ह्यातील काही भागात अज्ञात आजाराने डोके वर काढले असून, त्यामध्ये काही जनावरांचा मृत्यूदेखील झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पशुपालक धास्तावला असून, आपले जनावर लम्पींने तर मृत्युमुखी पडले नाही ना, अशी धास्ती त्याला सतावत आहे. दरम्यान, जिल्ह्याचा पशुसंवर्धन विभागदेखील अॅलर्ट मोडवर असून, जिल्ह्यातील ३ लाख ८० हजार गायवर्गीय जनावरांपैकी आजपर्यंत जवळ जवळ ३ लाख १० हजाराचे वर जनावरांचे लंम्पीचे लसीकरण पूर्ण झाले आहे. काही जनावरांचा अज्ञात आजाराने मृत्यू झाल्याने सदर जनावरांचे सॅम्पलदेखील तपासणीसाठी अकोला व पुणे येथे प्रयोगशाळेत पाठवले असल्याची माहिती आहे. त्यामुळे याचा अहवाल आल्यानंतरच नेमके कोणत्या आजाराने सदर जनावराचा मृत्यू झाला याचा सोक्षमोक्ष लागेल परंतु असे असले तरी, यामुळे पशुपालक मात्र धास्तावले असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आहे.
पशुपालकांनी घाबरण्याचे कारण नाही!
हा आजार गायवर्गीय जनावरांमध्येच आढळून येतो. ज्या जनावरांचे लसीकरण झाले नाही किंवा जी जनावरे बाहेरून आली त्यांनाच या आजाराचा धोका असतो, परंतु लसीकरणाने सदर आजार पूर्णतः बरा होतो, त्यामुळे पशुपालकांनी कोणतीही काळजी करण्याचे कारण नाही. विशेषत: पावसाळी दिवस असल्याने जनावरांचा गोठा स्वच्छ ठेवावा.
– डॉ. अमितकुमार दुबे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, बुलढाणा