– एसटीच्या बुलडाणा विभागीय नियंत्रकांना दिले निवेदन
चिखली (एकनाथ माळेकर) – लोणार तालुक्यासह जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी वेळेवर बसेस सुरु करा व मुला-मुलींचे शैक्षणिक नुकसान टाळा, अशी मागणी करत जिल्हा काँग्रेसच्या व्हीजेएनटी सेलचे अध्यक्ष तथा युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष भारतभाऊ राठोड यांनी बुलडाणा येथे एसटीच्या विभागीय नियंत्रकांना निवेदन दिले. लवकरात लवकर बसेस सुरु झाल्या नाहीत, तर बस आडवा आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही राठोड यांनी दिला आहे.
जिल्ह्यातील शाळकरी मुलांना खेड्यापाड्यातून शाळेत जाण्यासाठी एसटी बसचाच मोठा आधार आहे. परंतु, एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी अद्याप बस सोडलेल्या नाहीत. त्यामुळे मुला-मुलींचे मोठे नुकसान होत आहे. तसेच, अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी पासेस काढून बसलेले आहेत. त्यामुळे लोणार तालुक्यासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या वेळेवर बसेस सुरू करण्यात याव्यात, अशी मागणीही भारतभाऊ राठोड यांनी आज विभागीय नियंत्रक एसटी महामंडळ बुलढाणा यांना निवेदन देऊन केली आहे. शाळेच्या वेळेवर मुलांना बस उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याकरिता बुलढाणा येथे जाऊन निवेदन देण्यात आले. जर लवकरात लवकर बस सुरू न झाल्यास विद्यार्थ्यांना घेऊन बस आडवा आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. याप्रसंगी काँग्रेसचे साहेबरावदादा चव्हाण, एकनाथदादा राठोड, प्रमोदभाऊ जाधव आदी उपस्थित होते.
————-
Leave a Reply