– किनगावराजा परिसरात रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ
– माऊली हॉस्पिटलचे डॉ.नागरे यांचे आरोग्य सजगतेचे आवाहन!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे आणि वाढत्या आर्द्रतेमुळे सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी यांसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. किनगावराजा येथील माऊली हॉस्पिटलमध्ये या संसर्गजन्य आजारांच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे आढळले आहे. विशेषतः लहान मुले व ज्येष्ठ नागरिक या आजारांच्या कचाट्यात अधिक सापडत असल्याचे डॉक्टरांनी नमूद केले आहे.

या पार्श्वभूमीवर माऊली हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर नागरे यांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आणि सजग राहण्याचे आवाहन केले आहे. ‘पावसामुळे पाणी साचणे, हवामानातील बदल व डासांची वाढ ही रुग्णसंख्येतील वाढीमागील प्रमुख कारणे आहेत. यामुळे नागरिकांनी योग्य खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे,’ असे त्यांनी सांगितले. सध्या अनेक नागरिकांना खालील त्रास जाणवतो आहे: सर्दी, खोकला, ताप, हात-पाय दुखणे, अंगात थकवा व थंडी वाजणे, सरकारी दवाखान्यांपासून ते खाजगी रुग्णालयांपर्यंत सर्वत्र गर्दीचे चित्र असून, अनेक ठिकाणी ‘हाउसफुल’ची स्थिती आहे.
डॉ. नागरे यांनी पुढील महत्वाच्या सूचना दिल्या आहेत : पिण्याचे पाणी उकळूनच वापरावे, पाण्यात पोटॅश पावडर टाकावी, पावसात भिजल्यानंतर डोके कोरड्या टॉवेलने पुसावे, लक्षणे दिसताच त्वरित जवळच्या रुग्णालयात तपासणी करून उपचार घ्यावेत, लहान मुले व ज्येष्ठांची विशेष काळजी घ्यावी, सततचा पाऊस आणि साचलेले पाणी हे आजारांचे मुख्य स्रोत बनत आहेत. त्यामुळे नागरिकांनी स्वच्छतेकडे लक्ष द्यावे व आरोग्यदायी जीवनशैलीचा अवलंब करावा, असे आवाहन डॉ. नागरे यांनी केले.