अशोक इंगळे/साखरखेर्डा
साखरखेर्डा येथील श्रीमद्जगतगुरू पलसिध्द महास्वामी मठात दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी गुरूपौर्णिमा उत्सव साजरा केला जात आहे. गुरुपौर्णिमेला हजारो भक्त याठिकाणी उपस्थित राहून गुरूत्व स्विकारतात. पौराणिक, ऐतिहासिक व सांस्कृतिक पार्श्वभूमी असलेल्या साखरखेर्डा या नगरीला प्राचीन काळी पुराणातील नाव खेटकपूर असे होते. सुमारे एक हजार वर्षांपूर्वी उज्जैन पीठाचे पीठाधीश श्रीमद्जगतगुरू पलसिध्द महास्वामीजी हे धर्मप्रसारासाठी उज्जैन पीठातून बाहेर पडून वीरशैव धर्माची पताका खांद्यावर घेऊन देशातील विविध भागात संचार करत होते. देशभर भ्रमण करून ते पुरातन खेटकपूर (आजचे साखरखेर्डा) येथे विसावले. महास्वामींच्या वास्तव्याने हा परिसर पुनीत झाला असून, येथील नगराच्या दक्षिणेला किल्ल्याप्रमाणे मजबूत बांधकाम व कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेला तत्कालीन पुरातन पलसिध्द महास्वामी मठ येथे सुमारे एक हजार वर्षांपासून उन्ह, वारा, पाऊस झेलत अजूनही दिमाखात उभा आहे. पलसिध्द महास्वामींचे कार्य समस्त मानव जातीच्या कल्याणासाठी उच्च उदात्त मूल्यांचा पुरस्कार करणार्या वेदागम प्रसिद्ध अशा श्रीमद्जगतगुरू पंचाचार्यांनी ‘सर्वम् शिवमय जगत’ हा समानतेचा संदेश विश्वाला देण्यासाठी वीरशैव धर्माची स्थापना केली. पंचाचार्य जगद्गुरुंनी, प्राचीन शिवशरणांनी, शिव संतांनी तसेच धर्मगुरू शिवाचार्यांनी शूद्र, ब्राह्मण, स्त्री -पुरुष असा उच्च नीच भेदभाव न करता सर्वांना समान अधिकार सांगणारी परंपरा भारत देशात उज्वल केली आहे.
इसवी सणाच्या दहाव्या शतकात या परंपरेत उज्जयिनी सध्दर्म पीठावर सिंहासनाधीश्वर ‘श्री श्री श्री १००८ श्रीमदजगतगुरू पलसिद्ध महास्वामी’ हे महान धर्मगुरू होऊन गेले. उज्जयिनी पीठाचे ते साठावे जगद्गुरु होते. देशातील विविध भागात भ्रमण करीत त्यांनी आपल्या धर्मप्रचार यात्रेत अनेक दीन दुबळ्यांचा उद्धार करून अज्ञानी व धर्मभ्रष्ट लोकांना दिव्य उपदेशाने सन्मार्ग दाखवून उपकृत केले. बसवपूर्वकालीन धर्माचार्य म्हणून वीरशैव धर्मात व इतिहासात त्यांची ख्याती आहे. समोजोध्दार व धर्मप्रसारासाठी भारतभ्रमण करीत असतांना पुरातन खेटकपूर व आजचे साखरखेर्डा येथील अरण्यात धर्मपीठाची स्थापना करून आपले कार्य सुरू ठेवले. वीरशैव धर्माची पताका भारतभर फडकवून आपले धर्मकार्य पूर्ण झाल्यानंतर श्री पलसिध्द महास्वामींजींनी साखरखेर्डा (खेटकपूर) येथील अरण्यातील धर्मपीठाचे परिसरातील पलाश वृक्षाखाली संजीवनी समाधी घेतली. तो दिवस होता श्रावण वद्य चतुर्थी, शके ९८०, इ.स.१०५८ हा. एकहजार वर्षानंतरसुद्धा आजही हा पलाशवृक्ष महास्वामींच्या समाधीचा साक्षीदार आहे. विशेष म्हणजे, या पलाश वृक्षाला कधीही फुले येत नाहीत. मंदिराच्या उत्तरेकडील प्रवेश व्दारावर चांदीने मढविलेल्या पायाखालील दगडी शिळेवर श्री श्री श्री १००८ श्रीमदजगतगुरू परमहंस मरूळाचार्यवर्य श्रीमद्भुरूद्र पलसिध्द स्वामिन प्रसिदश्रीमन्नृप शालिवाहन शके ९८० हा मजकूर कोरलेला आहे. पलसिध्द महास्वामी मठाचे पीठावर सध्या ष. ब्र. १०८ वेदांताचार्य शिवाचार्य रत्न सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज पीठाधीश असून, ते माघ शु.पोर्णिमा, इ.स. रविवार दि.३० जानेवारी १९७२ मध्ये पलसिध्द धर्मपीठाचे गादीवर पीठाधीन झाले होते. तेव्हापासून आजतागायत त्यांनी अव्याहतपणे सद्गुरू पलसिध्द महास्वामीजींची गुरू परंपरा कायम जोपासत सर्व धर्म समानतेची शिकवण कायम ठेवून वीरशैव धर्माची पताका महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक तामिळनाडू, गोवा आदी राज्यांपर्यंत पोहोचवीत सध्दर्मपीठ म्हणून या मठाची ओळख निर्माण केली आहे. मठामध्ये दरवर्षी धर्मसभा, सर्वधर्म संमेलन आयोजित करून राष्ट्रीय एकात्मतेचा अनोखा संदेश जनमाणसात देत आहेत. दरवर्षी ‘गुरूपौर्णिमेला’ स्वामीजींचा शिष्यसमुदाय देशातील विविध भागातून हजारो भाविक भक्त व अनुयायी येथे हजेरी लावतात. तसेच वेदान्ताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांच्या वाणीतून हेच विचार ऐकण्यासाठी शिष्य संप्रदाय तथा सर्व जाती धर्माचे भाविक भक्त येथे गर्दी करतात.
धर्म एकच आहे याची महती पटवून देण्यासाठी सर्व जातीधर्माची माणसं एकत्र आली पाहिजे म्हणून दरवर्षी पलसिध्द महास्वामींच्या स्मृतीमहोत्सवात सर्व धर्म संत सम्मेलन आयोजित करून भेदभाव नष्ट करण्याचा, धर्मसभा, सर्वधर्म संमेलन आयोजित करून राष्ट्रीय एकात्मतेचा अनोखा संदेश सिध्दलिंग शिवाचार्य महाराज देत आले आहेत. त्यामुळेच सर्व जातीधर्मांच्या व्यक्ती येथे माथा टेकवितात. महाराजांच्या वाणीतून हेच विचार ऐकण्यासाठी देशातील विविध भागातून सर्व जाती धर्माचे हजारो भाविक भक्त येथे हजेरी करता येतात. सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज यांचे वय सध्या ८५ वर्ष झाले असून मागील वर्षी इ.स. २०२३ मध्ये त्यांनी आपले पट्टशिष्य वेदांताचार्य सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांचा पट्टाभिषेक करून गादीवर बसविले आहे. वेदांताचार्य सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज हेही या धर्म यज्ञात सहभागी होतात. अयोध्या येथे रामलल्ला प्रतिष्ठापना कार्यक्रमाला मठाधीपती सद्गुरू सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांना तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी आवर्जुन आदरपूर्वक निमंत्रित केले होते. तसेच सिध्दचैतन्य महाराज हे सदैव धर्माच्या कामात देशभरात भ्रमण करून वीरशैव धर्माची पताका खांद्यावर घेऊन धर्माप्रसारासाठी प्रवास करीत अस्ातात. पलसिध्द मठाच्या शाखा साखरखेर्डासह आष्टी (जालना)सह अनेक ठिकाणी आहेत. श्रीमदजगतगुरू पलसिध्द महास्वामी, वेदांताचार्य सद्गुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराजांसह वेदांताचार्य सिध्दचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे शिष्य संप्रदाय व अनुयायी देशभरात महाराष्ट्रासह, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू राज्यांसह देशातील विविध भागात पसरलेला आहे. दरवर्षी गुरूपौर्णिमेला येथील पलसिध्द महास्वामी मठात मोठा धार्मिक तथा सांस्कृतिक सोहळा होत असतो. या सोहळ्याला महाराष्ट्र, कर्नाटक तामिळनाडूसह देशभरातील विविध भागातून महाराजांचा शिष्य संप्रदाय, भक्त गण व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित असतात.