– दुबईत झालेल्या ‘मिस एशिया वर्ल्ड २०२५’ सौंदर्यस्पर्धेत ऐतिहासिक विजय; संपूर्ण देशासाठी अभिमानाचा क्षण!
शेगाव/सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – भारताच्यावतीने सौंदर्य, आत्मविश्वास, आणि सामाजिक भान यांची त्रिसूत्री सादर करत शेगाव (जि. बुलडाणा) येथील गायत्री रोहनकर हिने दुबईमध्ये झालेल्या ‘मिस एशिया वर्ल्ड २०२५’ स्पर्धेत बाजी मारली. हा गौरवप्राप्त किताब पटकावत तिने संपूर्ण देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल केले आहे.
दि.२२ जून २०२५ रोजी दुबईतील ब्रिस्टोल हॉटेल, देरा येथे पार पडलेल्या या आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेत ४० हून अधिक आशियाई देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता. स्पर्धेच्या विविध फेर्यांत गायत्रीने केवळ सौंदर्य नव्हे, तर तिचे आत्मभान, संवाद कौशल्य आणि सामाजिक जाणिवा यामुळे परीक्षकांवर गारुड पाडले. अंतिम फेरीत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना गायत्री म्हणाली, की ‘आधुनिक युगात सौंदर्य ही केवळ देखाव्यापुरती संकल्पना नाही. सौंदर्य म्हणजे दुसर्याच्या आयुष्यात आशा आणि प्रेरणा निर्माण करणारी शक्ती आहे.’ तिच्या या उत्तराने संपूर्ण सभागृह स्तब्ध झाले आणि परीक्षकांनी एकमताने तिला ‘मिस एशिया वर्ल्ड २०२५’चा किताब प्रदान केला. स्पर्धेतील अंतिम क्षणी सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री व माजी मिस वर्ल्ड डॉ. अदिती गोवितकर यांच्याहस्ते गायत्रीच्या शिरावर विजयाचा मुकुट ठेवण्यात आला. या क्षणी संपूर्ण सभागृह टाळ्यांच्या प्रचंड गजराने दणाणून गेले. गायत्रीने भावूक होत आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, कुटुंबीय, गुरुजन व भारतातील सामान्य जनतेला दिले. ‘माझं हे यश केवळ वैयक्तिक नाही, तर माझ्या गावासाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी आणि देशासाठी आहे. ग्रामीण भागातून येऊन आंतरराष्ट्रीय पातळीवर विजय मिळवणे हा माझ्यासाठी खरा गौरव आहे,’ असे ती म्हणाली. महाराष्ट्रातून विविध सामाजिक संस्थांनी, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. गायत्री रोहनकरचे हे यश केवळ सौंदर्याच्या क्षेत्रात मिळालेला विजय नाही, तर ग्रामीण भारतातील तरुणींना दिलेली प्रेरणा आहे. तिचा आत्मविश्वास, बुद्धिमत्ता आणि समाजकार्याचा वारसा हे आजच्या पिढीचे आदर्श ठरत आहेत.
गायत्रीचे प्राथमिक शिक्षण शेगावमधील स्थानिक शाळेत झाले असून, तिने इंजिनीअरिंग पूर्ण केल्यानंतर मॉडेलिंग क्षेत्रात प्रवेश केला. तिने केवळ सौंदर्य क्षेत्रातच नव्हे, तर ‘उज्ज्वला’ या उपक्रमाद्वारे ग्रामीण मुलींसाठी आरोग्य व शिक्षण क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले आहे. गायत्रीच्या या यशामुळे शेगावमधील तिच्या घरासमोर आणि परिसरात जल्लोषाचे वातावरण आहे. स्थानिकांनी फटाके फोडून, मिठाई वाटून आनंद साजरा केला. सोशल मीडियावर तिच्या अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.