– चिखली आगाराच्या थातूरमातूर दुरूस्तीचा फटका; चिखली ते राजेगाव दोन्ही प्रवासी बसेस एकाचवेळी रस्त्यावरच बंद!
– काळ्या धुरामुळे प्रवासी घाबरले, खाली उतरले अन् प्रवाशांची निघाली दोन किलोमीटर पायीदिंडी!
चिखली (रंजना मोरे) – चिखली आगारातील बसेसचे दुरुस्तीचे काम करणारे मेकॅनिक कर्मचारी हे थातूरमातूर कामे करून मोकळे होतात, त्यामुळे प्रवासी एसटी बसची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, बसेस रस्त्यावर सुस्थितीत धावत नाहीत. त्यामुळे एखाद्या जीवघेण्या अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. काल सकाळी आणि दुपारची चिखली ते राजेगाव या दोन्ही प्रवासी बसेस रस्त्यावर चालूमध्ये काळा धूर ओकू लागल्या. हे पाहून बस पेटणार या भीतीपोटी वाहक व चालक यांनी घाबरून दोन्ही बसेस मेरा खुर्द गावाजवळ उभ्या करून देत बसमधील प्रवासी खाली उतरून दिले. त्यामुळे प्रवाशांवर दोन किलोमीटर पायी जाण्याची वेळ आली. हा प्रकार काल, दि.१९ जून रोजी मेरा खुर्दजवळ उघडकीस आला.

चिखली आगार विभागाचे व्यवस्थाक जोंगदंडे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागासह लांब पाल्यांच्या प्रवाशांसाठी बसेस सोडल्या जातात. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून चिखली आगार विभागात बस दुरुस्तीच्या कामासाठी अनेक कर्मचारी काम करतात. परंतु या कर्मचार्यांकडे व्यवस्थापक यांचे दुर्लक्ष असल्याने या लोकांचा मनमानी कारभार वाढला आहे. हे कर्मचारी थातूरमातूर बसची दुरुस्ती करून बस बाहेर पाठवितात. मात्र या थातूरमातूर दुरुस्ती केलेल्या बसेस रस्त्यावर कुठेही चालू मध्ये बंद पडतात. त्यामुळे चिखली आगारातील चालक-वाहक, प्रवासी व नागरिक यांचा जीव धोक्यात आला आहे. सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. या काळात मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील नागरिक एसटीतून प्रवास करतात. हाच प्रवास आता बिन भरोसाचा झाला आहे. तर, दुसरीकडे लग्नसराई काळ पाहता राज्य परिवहन मंडळाने २५ टक्के भाडेवाढ केली आहे. ही भाडेवाढ जर अशा बसने प्रवास करावा लागत असेल, तर प्रवाशांना काहीच कामाची नाही. एसटी बस दररोज कुठल्या ना कुठल्या रस्त्यावर नादुरुस्त झाल्याचे पहावयास मिळते. यामुळे प्रवाशांना जाण्याच्या ठिकाणी अडचण निर्माण होऊन मध्येच अडकावे लागते. राज्य सरकारने महिलांसाठी ५० टक्के सवलतीच्या दरात एसटीचा प्रवास ही योजना अंमलात आणली. तेव्हापासून एसटीवरचा प्रवाशांचा अधिकचा भार वाढलेला आहे. त्यात एसटी बसच्या गाड्या वेळेवर त्याची देखभाल दुरुस्ती होत नाही. फक्त नावापुरत्याच बसेस दुरुस्त्या केल्या जातात. अशा गाड्या प्रवाशांना घेऊन रस्त्यावर धावत आहेत.
एसटी बसचे चालक वारंवार गाड्यांच्या तांत्रिक खराबी बाबत लेखी पाठपुरावा अथवा तोंडी एसटीच्या कार्यशाळेत करतात; परंतु गाड्यांची थातूरमातूर मलमपट्टी करून बस जीवघेणा प्रवास करण्यास रस्त्यावर पाठवल्या जातात. असाच एक प्रकार काल, दि.१९ जून रोजी उघडकीस आला. त्यामध्ये चिखली आगार विभागातून सकाळी चिखली ते राजेगाव ही प्रवाशी बस सोडण्यात आली. मात्र परत येताना मेरा खुर्द गावालगत काळा धूर फेकत बंद पडली. त्याच पाठोपाठ ११ वाजता चिखली ते राजेगाव ही प्रवासी बस पुन्हा राजेगाव वरून चिखलीकडे परत येत असताना मेरा खुर्दजवळ काळा धूर फेकत बंद पडली. या दोन्ही प्रवासी बसेस धूर फेकत गरम झाल्याने गाडी पेटणार की काय, अशा भीतीपोटी वाहक चालक यांनी गाडीतील प्रवाशी खाली उतरून दिले. परंतु वाहक चालकांनी प्रवाशांना दुसर्या बसमध्ये बसून दिले नाही. त्यामुळे प्रवाशांना पायी दोन किलोमीटर अंतराचा प्रवास करावा लागला. त्यात अनेक महिला, पुरुष वयोवृद्ध होते. काही लहान मुले, गरोदर, स्तनदा माता असल्याने त्यांना फार मोठा त्रास सहन करावा लागला. त्यामुळे आगार व्यवस्थापक संतोष जोंगदंडे यांनी तात्काळ बस दुरुस्ती कर्मचार्यांकडे लक्ष केंद्रित करावे, जेणे करुन प्रवाशांना एसटीचा प्रवास चांगल्या प्रकारे करता येईल, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.