– शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिन मेळाव्यातून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मोदी-शाहांवर घणाघाती टीका!
– शिवसेना-मनसे युतीबाबत उद्धव ठाकरेंचे सकारात्मक संकेत; मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून मालकांचे नोकर भेटीगाठी घेताहेत – शिंदेंवर टीकास्त्र!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – पहलगाम हल्ल्यात हिंदूंना ठार मारणारे दहशतवादी कुठे गेले? पातळात गेले, आकाशात गेले की भाजपत गेले? पर्यटकांवर गोळ्या घालणारे दहशवादी गेले कुठे? असा बोचरा सवाल शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला केला. शिवसेनेचा 59 वा वर्धापन दिन सोहळा मुंबईत जल्लोषात पार पडला. याप्रसंगी शिवसैनिकांशी संवाद साधताना ठाकरे यांनी महायुतीच्या नेत्यांवर घणाघाती टीकास्त्र डागले. मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून मालकांचे काही नोकर भेटीगाठी घेत आहेत, अशी टीका ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा नामोल्लेख टाळून करत, जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच होणार आहे, असे सांगत शिवसेना-मनसे युतीचे स्पष्ट संकेत दिले. जे आपला बाप बदलतात. त्यांना राजकारणात पोरं होत नाहीत. अशी लोकं आमच्या घराणेशाहीवर टीका करतात, अशा शब्दांत त्यांनी राणे पिता-पुत्रांवरही जोरदार टीकास्त्र डागले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, की शिवसेना स्थापन झाली तेव्हा दाढी खाजवणारे कुठे होता माहिती नाही. सर्व चोरांचा बाजार आहे. भाजपाची पाळलेली बेडकं डराव डराव करत आहेत. पक्ष फोडला, चिन्ह चोरले, बाप चोरला. आता आमचे लोक नेत आहेत. शिवसेना संपत कशी नाही, उद्धव ठाकरे संपत कसा नाही, असा प्रश्न या लोकांना पडला आहे. शिवसेनाप्रमुखांनी रक्त आटवून शिवसेना नावाचे वादळ तयार केले आहे. पैसे फेकून तयार केलेली माणसे नाही, कट्टर शिवसेना धर्म पाळणारे शिवसैनिक आहेत. ५९ वर्ष पक्षाला झाली, यावर कोणाचा विश्वास बसणार नाही. शिवसेना आजही तरुण आहे आणि तरुणच राहणार आहे. मला खरच कीव येते, जे आपला बाप बदलतात आणि राजकारणात पोरे होत नाही, अशी लोक आपल्या घराणेशाहीवर टीका करत आहेत. आमच्याकडून किती पोरे घेऊन जायची, तेवढी घेऊन जा, या शब्दांत पक्षातील गळतीवरून उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला.
दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिनाचा सोहळा आज मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी झाला. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा वर्धापन दिन सायन येथील षन्मुखानंद सभागृहात झाला. या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या नेत्यांवर जहरी टीका केली. उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर तुफान टीकास्त्र डागले. केंद्रात सरकार आल्यापासून पणवतीच लागली असल्याची बोचरी टीकाही त्यांनी केली. आज देशात केंद्र सरकारची काय अवस्था झाली आहे. केंद्रात सरकार आल्यापासून पणवती लागली आहे. मंदिराचं छत गळतंय, विमान अपघात झाला. रेल्वे अपघात झाला, पण कोणी जबाबदारी घ्यायला तयार नाहीत. मेट्रोत पाणी भरलं. आज देशाला पंतप्रधानाची गरज आहे. भाजपाला पंतप्रधान आहे, देशाला नाही. देशाला गृहमंत्र्यांची गरज आहे. घरफोड्या अमित शाहची गरज नाही. देशाला संरक्षण मंत्र्याची गरज आहे. गुंडांना संरक्षण देणार्या देवेंद्र आणि राजनाथ सिंह यांची नाही. तुम्ही देशाचे संरक्षण मंत्री आहात का गुंडांचे? तुम्ही देशाचे गृहमंत्री आहात की तुमच्या पक्षाचे घरफोडे मंत्री आहात? असे जळजळीत सवाल उद्धव ठाकरे यांनी केले.
होणार की नाही होणार हे कळेल. यांच्या मनात आहे ते तुमच्या मनात आहे ते करेन. पण ते होऊ नये म्हणून मालकांचे नोकर भेटीगाठी घेताहेत. मुंबई मराठी माणसाच्या हातात जाऊ नये म्हणून शेटजींचे नोकर प्रयत्न करताहेत. होणारच नाही म्हणताहेत. आमचं आम्ही बघू काय ते., असे सांगून उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबत युतीचे स्पष्ट संकेत दिलेत. भाजपचे नामोनिशाण आम्ही महाराष्ट्रातून मिटवून टाकू. ‘शेठजींचे नोकर आणि नोकरांचे नोकर आज तिकडे वर्धापन दिन साजरा करत आहेत. आम्ही हिंदूत्व सोडले म्हणता व तुम्ही सौगात वाटता. सोफिया कुरेशीला दहशतवाद्यांची बहिण म्हणतात हे भाजपवाले आहेत. वॉर रूकवा दी पप्पा म्हणणारे ट्रम्पचा कॉल आल्यावर कुठं गेला आवाज? दहशतवादी गेले कुठं…पाताळात गेले की भाजपात.. फक्त दाऊदला भाजपात घ्यायचे तेवढे बाकी असल्याचा टोला उद्धव ठाकरेंनी याप्रसंगी लगावला.