– शेतकरीवर्गाने सावध राहण्याचे कृषी विभागाचे आवाहन
– गावोगावी एजंट सक्रीय; प्रतिबंधित एचटीबीटी कपाशी बियाणे विक्रीतून शेतकर्यांची फसवणूक!
बुलढाणा (राजेश लोखंडे) – सध्या बाजारपेठेत अनधिकृतपणे एचटीबीटी कपाशीच्या बियाण्यांची विक्री मोठ्या प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. यामुळे शेतकर्यांची फसवणूक होण्याची शक्यता निर्माण झाली असून, कृषी विभागाने याबाबत गांभीर्याने दखल घेतली आहे. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी स्पष्ट केले की, ‘एचटीबीटी’ कपाशीची लागवडीला भारतात कायदेशीर मान्यता नाही. त्यामुळे अशी बियाणे विक्री करणे व खरेदी करणे हे दोन्ही बेकायदेशीर आहे. अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
मनोजकुमार ढगे यांनी यावेळी शेतकर्यांना आवाहन करताना सांगितले की, प्रतिबंधित एचटीबीटी बियाण्यांचा वापर केल्यास उत्पादनाच्या बाबतीत गंभीर परिणाम होऊ शकतात. बियाणे खरीदी करताना अधिकृत कंपन्यांचे व कृषी विभागाने मान्यता दिलेलेच बियाणे घ्यावे. अनधिकृत विक्रेत्यांच्या मोहजालात अडकू नये. बियाणे विक्रीत वाढलेल्या फसवणुकीच्या प्रकारामुळे आता शेतकर्यांचे प्रबोधन अत्यंत गरजेचे बनले आहे. अनधिकृत बियाण्यांच्या मोहात येऊन शेतकरी त्यांचे आर्थिक व नैसर्गिक नुकसान करून घेत आहेत. बियाण्यांची विश्वासार्हता, उत्पादनक्षमता, तसेच कीटकनाशकांच्या प्रतिकारशक्ती बाबत चुकीची माहिती दिली जाते आणि शेती संकटात सापडतो. शेतकर्यांनी बियाणे खरेदी करताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात – १)केवळ कृषी विभागाच्या परवानगीप्राप्त दुकानांतूनच बियाणे खरेदी करावीत. २) पॅकेजिंगवर उत्पादक कंपनीचे नाव, बॅच नंबर, उत्पादन व कालबाह्यता तारीख यांची खातरजमा करावी. २) शंका असल्यास जवळच्या कृषी कार्यालयात त्वरित संपर्क साधावा. कृषी विभागानेही यासंदर्भात कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या असून, बाजारातील बियाण्यांच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येत आहे. अनधिकृत विक्री करणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही विभागाने स्पष्ट केले आहे. शेतकर्यांनी सावध राहावे, कायदेशीर मार्ग स्वीकारावा आणि त्यांच्या मेहनतीचे सोनं होण्यासाठी अधिकृत व सुरक्षित बियाण्यांचाच वापर करावा, असा संदेश कृषी विभागाकडून देण्यात आला आहे.
- दरम्यान, सूत्रांच्या माहितीनुसार, गुजरातमधून दोन महिन्यांपूर्वी अनधिकृत एचटीबीटी कपाशी बियाणे जिल्ह्यात दाखल झाले. या बियाण्याची शेतकर्यांमधून मागणी असल्याने, गावागावांमध्ये एजंटच्या माध्यमातून जिल्ह्याअंतर्गतच विक्री केली जात आहे. मात्र लागवडीच्या तोंडावर मागील पंधरा दिवसापासून कृषी विभागाचे भरारी पथक सक्रीय झाले आहे. मात्र परराज्यात अनधिकृत बियाणे जिल्ह्यात दाखल झाले,त्यावेळी कृषी विभागाची भरारी पथके झोपेत होती का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
- यात अस्सल एचटीबीटीच्या नावाखाली नकली एचटीबीटी बियाणे देखील शेतकऱ्यांच्या माथी मारले जाण्याची शक्यता कापूस तज्ज्ञांनी वर्तविली असून, अशाप्रकारे जर कोणी बेकायदेशीर एचटीबीटीची विक्री करताना आढळल्या कडक कारवाईचा स्पष्ट इशारा कृषी विभागाच्यावतीने देण्यात आला आहे. यावर्षी कधी नव्हे इतक्याप्रमाणात बाजारपेठेत अवैधरित्या एचटीबीटी कापूस बियाणाची विक्री सुरू असल्यामुळे बियाणे उत्पादक कंपन्या, विक्रेत्यांमध्ये कमालीचा संभ्रम निर्माण झाला आहे. समाधानकारक मिळणारे उत्पादन, कीड आणि रोगांचा अल्प प्रमाणात प्रादुर्भाव, तणनाशकाचा वापर, बाजारभावाचा अभाव आदी सबबींमुळे कापूस शेतकरी एचटीबीटी बियाणाचा आग्रह धरीत असल्याचे कृषी उत्पादन विक्रेत्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.