– नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथील दुर्देवी घटना
– देवदर्शनासाठी गेल्या असता नदीत पाय घसरून पडल्याने बुडाल्या!
खामगाव (तालुका प्रतिनिधी) – नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथे देवदर्शनासाठी गेलेल्या मायलेकीचा विश्वगंगा नदीत बुडून मृत्यू झाल्याने खामगाव शहरावर शोककळा पसरली आहे. शहरातील सुटाळपुरा भागातील पूनम मयूर जामोदे (वय २०) आणि आर्वी मयूर जामोदे (वय ३ वर्षे) अशी या मायलेकींची नावे आहेत. या दुर्देवी घटनेत एकूण सहा जण नदीत बुडाले हाेते. परंतु, इतर चौघांना वाचविण्यात यश आले असून, हे सर्वजण एकाच कुटुंबातील आहेत.
खामगाव शहरातील सुटाळपुरा येथील जामोदे कुटुंबीय नांदुरा तालुक्यातील निंबादेवी देवस्थान येथे देवदर्शनासाठी गेले होते. खामगाव सामान्य रूग्णालयातील माजी कर्मचारी गजानन जामोदे यांचे हे कुटुंबीय आहे. निंबादेवी हे वडनेर भोलजीनजीक असून, विश्वगंगा नदीत पाय घसरून पडल्याने सहा जण नदीत बुडायला लागले होते. इतरांना वाचविता आले, परंतु पूनम मयूर जामोदे (वय २०) आणि आर्वी मयूर जामोदे (३ वर्षे) या मायलेकींची मात्र नदीत बुडून मृत्यू झाला. आज (दि.१५) दुपारी ही दुर्देवी घटना घडली. घटनास्थळी मलकापूर पोलिसांनी धाव घेऊन मदत व बचाव कार्य राबवले. जखमींना मलकापूर येथे हलविण्यात आले असता, या दोन्हीही मायलेकींचा मृत्यू झाल्याचे दिसून आले. या घटनेतील मयूर जामोदे (वय २५), राधा जामोदे, संध्या सागर जामोदे या तिघांवर मलकापूर सामान्य रूग्णालयात उपचार सुरू होते.
दरम्यान, प्रत्यक्षदर्शींनी सांगितले, की मृतक पूनम मयूर जामोदे व तिची मुलगी आर्वी मयूर जामोदे या देवीचे दर्शन घेऊन नदीपात्रात अंघोळ करत असताना पाय घसरून पाण्यात पडल्या. त्यांना वाचवण्यासाठी सोबत असलेल्या संध्या सागर जामोदे (३४) व राधा गजानन जामोदे (५४) यांनीही पाण्यात उडी घेतली. पाण्यात पडलेले हे सर्वजण बुडायला लागले होते. जवळ असलेले कृष्णा काळे (रा. चांदूरबिस्वा) आणि संतोष पठाडे (रा. केदार) यांनी तातडीने धाव घेऊन यातील दोघींना बाहेर काढले. चारही महिलांना तातडीने डॉ. चेतन जाधव यांच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान पूनम आणि तिची चिमुरडी आर्वी यांचा मृत्यू झाला. त्यांचे नाकातोंडात पाणी गेल्याने श्वास गुदमरून हे मायलेक मृत्युमुखी पडल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.