– मंजूर घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त करून घेण्यासाठी अधिकारी कामाला लागले!
– सिंदखेडराजा पंचायत समितीला नव्याने ७,७३७ घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त
दुसरबीड (भगवान नागरे) – सिंदखेडराजा पंचायत समितीला प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत दुसर्या टप्प्यातील नव्याने ७,७३७ एवढे घरकुलाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून, त्यासाठी पंचायत समिती प्रशासन सज्ज झाले आहे. मंजूर घरकुल लाभार्थ्यांचे प्रस्ताव प्राप्त करून घेण्यासाठी अधिकारी व कर्मचारी हे मिशन मोडवर काम करीत असल्याचे दिसून येत आहे.
आज, दिनांक १० जूनरोजी तालुक्यातील ग्रामपंचायतमध्ये कॅम्प आयोजित करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घरकुलाची उद्दिष्ट प्राप्त झाले होते, अशा ठिकाणी इतर ग्रामपंचायत अधिकारी यांची सहकार्य करण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती. त्याचबरोबर सनियंत्रणासाठी विस्तार अधिकारी दर्जाचे अधिकार्यांची नेमणूक करण्यात आली होती. घरकुलाचे प्रस्ताव प्राप्त करण्यासाठी आयोजित आलेल्या कॅम्पमध्ये एका दिवसात ३००० प्रस्ताव तयार करून पंचायत समिती कार्यालयास सादर करण्यात आले, तसेच उर्वरित लाभार्थ्यांचे प्रस्ताव येत्या सात दिवसात सादर करण्याच्या ग्रामपंचायत अधिकारी यांना गटविकास अधिकारी यांनी सूचना दिल्या आहेत.
सर्व घरकुल लाभार्थी यांना आवाहन करण्यात येते की, त्यांनी प्रस्ताव सादर करण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयास संपर्क साधावा. तसेच घरकुल प्रस्ताव मंजुरीसाठी कुठलीही आर्थिक देवाण-घेवाण करू नये.
– अंकुश म्हस्के, गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिंदखेडराजा