– मेहकर तालुक्यात ६८२८ घरकुलांसाठी ४३ हजार ब्रास वाळूची गरज!
– लोणार तालुक्यातील रेती घाटावर मेहकर तालुक्यातील घरकुलांची मदार!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – मेहकर तालुक्यात शासकीय रेती घाट नसल्याने घरकुलांसाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. तालुक्यातील ६८२८ घरकुलांसाठी तब्बल ४३ हजार १४० ब्रास वाळूची गरज आहे. मेहकर तालुक्यातील सदर घरकुलांसाठी लोणार तालुक्यातील उपलब्ध असलेल्या रेती घाटातून वाळू द्यावी, अशी मागणी तहसीलदार नीलेश मडके यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. मेहकर तालुक्यात रेती घाटच उपलब्ध नसल्याने प्रशासनाला यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
केंद्र व राज्य शासनाकडून विविध योजनेतून मोठ्या प्रमाणात घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. मोदी आवास योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचे लाभार्थ्यांची संख्या तुलनेने जास्त आहे. सदर सर्वच घरकुलांसाठी ५ ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय राज्य शासनाने ३ एप्रिल रोजी घेतला आहे. याबाबत मेहकरचे तहसीलदार नीलेश मडके यांनी जिल्हाधिकार्यांना ५ जूनरोजी एक पत्र पाठवून, त्यामध्ये म्हटले आहे की, मेहकर तालुक्यातील पैनगंगा नदीवरील सोनाटी येथून ५० ते १०० ब्रास मातीमिश्रीत, बोरी येथून ५० ते १०० ब्रास मातीमिश्रीत व मेहकर येथून १०० ब्रास मातीमिश्रीत वाळू निघू शकते. परंतु सदर रेती घाटाचा अजून लिलाव झाला नसून, पैनगंगा नदीतील वाळू पाण्याखाली आहे. गट विकास अधिकारी मेहकर यांच्याकडून ६८२८ घरकुल लाभार्थ्यांची यादी प्राप्त झाली असून, प्रति लाभार्थी ५ ब्रास याप्रमाणे ४३,१४० ब्रास वाळूची मागणी करण्यात आली आहे. परंतु मेहकर तालुक्यात रेती घाट नसल्याने सदर घरकुलांसाठी वाळू पुरवणे या कार्यालयाकडून शक्य नाही. तरी सदर घरकुलांसाठी लोणार तालुक्यातील उपलब्ध रेती घाटातून मेहकर तालुक्यातील ८६२८ घरकुलांसाठी ४३,१४० ब्रास वाळू उपलब्ध करून द्यावी, अशी विनंतीही सदर पत्रात करण्यात आली आहे. त्यामुळे आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, याकडे घरकुल लाभार्थ्यांचे लक्ष लागून आहे. याबाबत तहसीलदार निलेश मडके यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता होऊ शकला नाही.
शासनाच्या मोफत वाळूच्या भरवशावर घरकुले पूर्ण होणार?
शासनाने घरकुलासाठी मोफत ५ ब्रास वाळू देण्याचा निर्णय घेतला आहे. मेहकर तालुक्याचा विचार करता, रेती घाट नसल्याने वाळू देणे शक्य नाही. त्यातच आता पावसाळा सुरू होणार असून, नदीला पाणी येणार असल्याने आहेत ते रेती घाटही पाण्याखाली जाणार असून, शेतीही पेरल्या जाणार असल्याने रस्तेसुध्दा बंद होणार आहेत. शिवाय, सदर वाळूही स्वखर्चाने आणावी लागणार असल्याने, सदर वाळू आहे त्या भावापेक्षाही महाग पडणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शासनाच्या मोफत वाळूच्या भरवशावर घरकुलाचे बांधकाम पूर्ण होणार का? असा प्रश्न घरकुल लाभार्थ्यांना सतावत आहे.