– शुल्कवाढीचा निर्णय मागे घ्या, पूर्वीचेच दर ठेवा; तुपकरांचे राज्य सरकारला पत्र
– शुल्कवाढ केंद्रचालक नव्हे तर शेतकरी, विद्यार्थी, गोरगरिबांचा खिसा कापणारी!
बुलढाणा (राजेश लोखंडे) – राज्य शासनाने दि. २५ एप्रिल पासून ‘आपले सरकार’ या सेवा केंद्राच्या शासकीय शुल्कात दुप्पटीने वाढ केली आहे. या निर्णयामुळे नागरिक, विद्यार्थी, शेतकरी व सेवा केंद्र चालक यांच्या मध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सदरचा शुल्क वाढीचा निर्णय त्वरित मागे घेऊन पूर्वीचे दर कायम ठेवावे, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शुल्कवाढ रद्द करण्यासाठी रविकांत तुपकर हे स्वतः मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आज, दि. ५ मे रोजी निवेदन सादर केले. निवेदनात नमूद आहे की, विद्यार्थी, सर्वसामान्य नागरिक, शेतकरी तसेच महिला अशा सर्वच घटकातील नागरिकांना सेवा केंद्रामधून विविध प्रकारची कागदपत्रे तथा प्रमाणपत्रे घ्यावी लागतात. परंतू, वाढलेल्या शुल्कामुळे आर्थिक ताण पडत असून, अडचणीचा सामना करावा लागणार आहे. केंद्रचालकांनीही वाढीची चिंता व्यक्त केली आहे. सेवा शुल्क वाढल्यामुळे नागरिकांकडून सेवांचा वापर कमी होण्याची शक्यता आहे. शासन निर्णयानुसार महसूल विभाग, सामाजिक न्याय विभाग, ग्रामीण विकास विभाग, गृह विभाग आदीच्या एकूण १०२७ सेवा या केंद्रामार्फत दिल्या जातात. जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलियर, उत्पन्न दाखले, वय व अधिवास प्रमाणपत्र, प्रतिज्ञापत्र यासारख्या अत्यावश्यक सेवांचे दर आता दुपटीने वाढले आहे. विद्यार्थी शेतकर्यांची मुले सर्वसामान्य नागरिक आणि गोरगरिबांसाठी ही दरवाढ अत्यंत अडचणीची आहे. त्यामुळे शासनाने ही शुल्कवाढ रद्द करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.