– माजी आमदार दिलीप सानंदांना ‘महायुती’त घेण्यास मंत्री आकाश फुंडकरांचाच मोठा विरोध?
– माजी आमदार सानंदा यांनी पुन्हा घेतली एकनाथ शिंदे यांची भेट; निवेदनाआडून काय ‘शिजले’?
– अजित पवार गट की शिंदे सेना?; काँग्रेसच्या कार्यक्रमापासून मात्र सानंदा चारहात दूरच!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना नेते एकनाथ शिंदे काल, दि. २७ एप्रिलरोजी बुलढाण्याच्या दौर्यावर होते. दरम्यान, खामगावचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या फार्महाऊसवर एकनाथ शिंदे यांची पुन्हा भेट घेऊन त्यांना कथित निवेदन दिले. असे असले तरी या निवेदनाआडून मात्र बरेच काही ‘शिजत ‘असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार सानंदा यांचे काही प्रमुख शिलेदार पंधरा दिवसापूर्वीच राष्ट्रवादी अजित पवार गटात सामील झाले, तर दुसरीकडे माजी आमदार सानंदा यांनी काल पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. काही दिवसापूर्वी ते अजित पवार यांनाही भेटल्याची विश्वासनीय माहिती आहे. त्यामुळे सानंदा यांच्या मनात नेमके काय आहे? अशीही चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे. असे असले तरी मात्र काँग्रेसच्या कार्यक्रमापासून सध्या तरी ते चारहात दूरच दिसत आहेत. त्यांच्या निकटवर्तीयांच्या माहितीनुसार, सानंदा यांना राजकीय पुनर्वसन हवे असून, त्याबाबत मात्र एकनाथ शिंदे किंवा अजितदादा पवार हे ठोस शब्द द्यायला तयार नाहीत. भाजपचे नेते व मंत्री आकाश फुंडकर यांचा सानंदा यांना ‘महायुती’त घेण्यात मोठा विरोध असून, त्यामुळेच सानंदा यांना अद्याप तरी शिंदे असो की अजितदादा यांनी ‘वेटिंग’वर ठेवले आहे. ”सानंदांना महायुतीत घेणे म्हणजे सवत घरी आणणे”, अशा ना. फुंडकर समर्थक भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या खासगीतील प्रतिक्रिया आहेत.
काँग्रेसच्या उमेदवारीवर तीनदा आमदार राहिलेले माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी एक महिन्यापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्या माध्यमातून शिंदे गटाचे प्रमुख नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती, व मागण्यांचे निवेदन दिले होते. त्यामुळे चर्चाचे आगे मोहोळ उठल्यानंतर माजी आमदार आनंद यांनी ‘जब तक जिंदा हूं, काँग्रेस का परिंदा हू’! अशी मोजकीच प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे चर्चेला काहीसा विराम मिळाला होता. त्यानंतर काही दिवसातच खामगाव बाजार समितीचे काँग्रेसचे सभापती सुभाष पेसोडेंसह काही संचालकांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत व आमदार मनोज कायंदे यांच्या माध्यमातून अजित पवार गटात प्रवेश केला. माजी आ.सानंदा या प्रवेशापासून लांब राहिल्याचे दिसले असले तरी, त्यांच्या संमतीशिवाय हे शक्यच नाही, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. दरम्यान, काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे जनआभार दौर्यानिमित्त बुलढाणा दौर्यावर आले होते. बुलढाणा येथील कार्यक्रम आटोपल्यानंतर आमदार संजय गायकवाड यांच्या राजूर रस्त्यावरील फार्म हाऊसवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेवणासाठी गेले असता, माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी त्यांना भेटून एक निवेदन दिले. निवेदनाच्या निमित्ताने ही दुसर्यांदा भेट घेतली असली तरी, या निवेदनाआडून बरेच काही ‘शिजत’ असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात आहे.
माजी आ.सानंदा हे एकनाथ शिंदे यांना दोनदा भेटल्याने राजकारणातील जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे, काही दिवसापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीदेखील भेट घेतली होती, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार सानंदा हे एकनाथ शिंदे व अजित पवार या दोघांनाही भेटल्याने ते नेमके कोणत्या गटात जाणार, याबाबतदेखील चर्चा रंगत असून, माजी आमदार सानंदाही बुचकळ्यात पडल्याचे दिसून येत आहे. ‘जब तक जिंदा हूं काँग्रेस का परिंदा हू’! असे जरी सानंदा यांनी म्हटले असले तरी, त्यांच्या भेटीगाठीच्या सपाट्यांवरून हा ‘परिंदा’ कधीही उडू शकतो, अशी खात्रीही आता राजकीय धुरीणांना पटू लागली आहे. सानंदा यांनी अद्याप कोणत्याही पक्षात प्रवेश केला नसला तरी, काँग्रेसच्या कार्यक्रमापासून मात्र सध्यातरी ते चारहात दूरच दिसत आहेत. सानंदा यांनी काँग्रेस सोडल्यास पक्षाचे खामगाव मतदारसंघात मोठे नुकसान होण्याची शक्यता चर्चेत असली तरी, काँग्रेसचे निष्ठावंत मात्र सुंठी वाचून खोकला जाऊन काँग्रेस आणखीच बळकट होईल, असा आशावाद व्यक्त करत आहेत. सानंदा हे खामगावातील जाणकार नेतृत्व असले तरी वारंवार पराभवाने त्यांचा कार्यकर्त्यांचा ढाचा ढासाळला आहे, अशी प्रतिक्रियाही उमटत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून खामगावात काँग्रेसचा आमदार नसतानाही पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वज्रमूठ त्यांनी बांधून ठेवली होती. विधानसभेला त्यांनी 86 हजार मते घेतली होती. तथापि, काँग्रेसचे नवे नेतृत्व मात्र त्यांनी खामगावात तयार होऊ दिले नाही, असाही टीकेचा सूर उमटत असतो.