अहमदनगर (प्रतिनिधी) : मराठा समाजाला आरक्षण तातडीने द्यावे, यासह मराठा समाजाच्या मागण्या तातडीने मार्गी लावाव्यात, यासाठी अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली मुंबई येथे क्रांती मैदानावर मूक आत्मक्लेश अंदोलन केले जाणार आहे. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते अंदोलनात सहभागी होणार असल्याची माहिती मराठा महासंघाचे संयुक्त सरचिटणीस संभाजी दहातोंडे यांनी दिली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे ही गेल्या चाळीस वर्षापासूनची मागणी आहे. महासंघानेच सर्वात आधी आरक्षणाची मागणी केली होती. त्यासाठी अनेक वर्ष सातत्याने आंदोलने केली गेली. कोपर्डी घटनेनंतर राज्यात 58 मोर्चे निघाले. आरक्षणाची शेकडो तरुणाचे बळी गेले. मागील देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारने 16 टक्के आरक्षण दिले. परंतु, ते कोर्टात ते न टिकल्याने मराठा समाजाला आरक्षणाच्या लाभापासून वंचित रहावे लागले. आता राज्यामध्ये सत्तांतर होऊन एकनाथ शिंदे- देवेंद्र फडवणीस यांचे सरकार आले आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न शासनाने गांभीर्याने न्यायालयात मांडून मराठा समाजाला आरक्षण मिळवून द्यावे या समाजाच्या इतर विविध मागण्यांसाठी महासंघाचे अध्यक्ष अॅड. शशिकांत पवार यांच्या नेतृत्वाखाली नऊ आॅगस्ट रोजी क्रांतीदिनी त्यांनी क्रांती मैदानावर मूक आत्मक्लेश आंदोलन केले जाणार आहे. मराठा महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस दिलीपदादा जगताप, राष्ट्रीय उपाध्यक्ष संतोश नानावटे, युवक अध्यक्ष रणजित जगताप यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्यानी अंदोलनात सहभागी व्हावे, असे दहातोंडे म्हणाले.