– आठ वर्षांत सोन्याचे भाव तिप्पट; आजचे भाव लाखाच्या घरात; चांदीही चकाकली!
बुलढाणा (बाळू वानखेडे) – आठ वर्षांत सोन्याचे भाव तिपटीने वाढल्याचे दिसून येत असून, चांदी ही चांगलीच चकाकल्याचे दिसून येत आहे. राज्यात रजतनगरी म्हणून ओळखल्या जाणार्या खामगाव शहरात आज, दि. २२ एप्रिल रोजी सोन्याचा भाव प्रती तोळा ९९ हजार असून, चांदीही ९८ हजार प्रतिकिलोचे वर भाव असल्याचे सांगितले जात आहे. तर राज्यात काही ठिकाणी सोन्याचे भाव लाखाच्या वर प्रतितोळा होता. तर ऐन लग्नसराईत सोने महागल्याने वधुपित्यांसमोर मोठेच आर्थिक संकट कोसळले आहे.
सोन्याचे दागिने अंगावर घालणे आजकाल प्रतिष्ठेचे समजले जाते. लग्न अथवा शुभ कार्यात तर याला आणखीनच महत्त्व असते. असे असले तरी बरेचजण गुंतवणूक म्हणूनही सोने खरेदी करतात. २०१७ मध्ये सोन्याचे भाव प्रतितोळा ३० हजाराचे आसपास होते. २०२१ मध्ये ४८ हजार ७००, २०२२ मध्ये ५२ हजार ६६०, २०२३ मध्ये ६५ हजार ३५५ तर २०२४ मध्ये ७७ हजाराचे आसपास प्रति तोळा होते. चांदीच्या भावातही दिवसेंदिवस वाढच होत आहे. आठ वर्षांपूर्वी सोन्याचा भाव प्रतितोळा ३० हजार रुपये इतका होता. आज तोच भाव लाखाच्या घरात गेल्याने गेल्या आठ वर्षांत हे भाव तिप्पट झाल्याचे दिसून येत आहे. शुध्द चांदीचे दागिन्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या जिल्ह्यातील खामगाव शहरात आज सोन्याचे भाव प्रति तोळा ९९ हजार होते तर चांदी प्रति किलो ९८ हजार होती. कालचे भाव सोने प्रति तोळा ९७ हजार २०० रुपये होते म्हणजे सोन्याच्या भावात एक दिवसात तोळ्यामागे १८०० रूपयांनी वाढ झाली. चांदी मात्र स्थीर आहे. असे असले तरी राज्यातील काही ठिकाणी आजचे सोन्याचे प्रति तोळा भाव लाखाच्यावर गेले असून, चांदीचे भावही वाढले आहेत. सतत वाढणारे भाव पाहता ग्राहकही संभ्रमात अन् संकटात पडले आहेत.
ट्रम्पनीती अर्थात अवाजवी लावलेल्या करामुळे भाववाढ सुरु असून अमेरिकेत तर परिस्थिती फारच अस्थीर आहे. पुढील काही दिवस भावाची हीच परिस्थिती राहणार आहे. यामुळे विशेषतः गेल्या दोन दिवसात सोन्याला ग्राहकीच नाही.
– मनोज शहा, जिल्हाध्यक्ष, सराफा असोसिएशन बुलढाणा
लग्नसराईच्या तोंडावर सोने महागले; अक्षयतृतीयेलाही बसणार फटका!
सोने-चांदीच्या भावात वाढ सुरूच असून, सोन्याच्या दरात रात्रीतून पुन्हा १५००-१८०० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. सोन्याचे दर ९९००० रुपये झाले आहेत. तर जीएसटीसह हेच सोन्याचे दर १०२००० रुपये इतके झाले आहेत. अजूनही सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता सोने व्यावसायिक यांनी व्यक्त केली आहे. अमेरिका आणि चायनामधील ट्रेड वॉर सोन्याच्या किंमती वाढीस कारणीभूत असल्याचे मानले जात आहे. दरम्यान, काहीच दिवसांवर अक्षय तृतीया असल्यानेदेखील सोन्याच्या भावात वाढ होण्याची शक्यता आहे, त्याचबरोबर लग्नसराई असल्याने सोने महाग झाले तरी खरेदी करताना दिसत आहेत.