– राज यांचा प्रस्ताव उद्धव ठाकरेंनी स्वीकारला; महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्यास तयार!
– ठाकरेबंधुंच्या एकत्र येण्याने महायुतीला बसणार जबरदस्त फटका!
मुंबई (धम्मप्रिया कांबळे) – उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का? हा सवाल गेल्या दशकभरापासून महाराष्ट्राच्या राजकारणात उपस्थित होत आहे. अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव में ट्रूथ’ या व्हीडीओ पॉडकास्टमध्ये राज ठाकरे यांनी अप्रत्यक्षरीत्या उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्ताव दिला. आमच्यातील वादापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. महाराष्ट्राच्या अस्तित्वापेक्षा वाद आणि भांडणे खूप छोटी आहेत, असे म्हणत राज ठाकरेंकडून शिवसेनेला एकप्रकारे युतीचा प्रस्ताव देण्यात आला. विशेष म्हणजे, प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनीदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला. मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्यासोबत युती करण्यास तयारी दर्शवली. त्यामुळे हे दोन भाऊ आता हातमिळवणी करणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.
अभिनेता- दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी नुकतीच राज ठाकरे यांची ‘वास्तव मे ट्रूथ’ या यू-ट्यूब चॅनलला मुलाखत घेतली. शिवसेनेसोबत अजूनही एकत्र येऊ शकता का?, असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी राज ठाकरेंना मुलाखतीमध्ये विचारला. या प्रश्नावर राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीबाबत भाष्य केले. सर्व मराठी माणसांनी एकच पक्ष काढावा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली. शिवाय, त्यांनी अनौपचारिकपणे उद्धव ठाकरे यांना युतीचा प्रस्तावही दिला. आमच्यातले (उद्धव ठाकरेंसोबतचे) वाद, भांडणं छोटी आहेत. महाराष्ट्र मोठा आहे. त्यामुळे एकत्र येणे, राहणे कठीण नाही, असे मोठे विधान राज ठाकरे यांनी केले. परंतु, विषय फक्त इच्छेचा आहे. हा एकट्या माझ्या इच्छेचा विषय नाही आणि माझ्या स्वार्थाचाही विषय नाही, असे राज ठाकरेंनी उत्तर दिले. राज यांच्या प्रस्तावानंतर मुंबईत कामगार सेनेच्या मेळाव्यादरम्यान बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘किरकोळ भांडण बाजूला ठेवून सोबत यायला मीदेखील तयार आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी सर्व मराठी माणसांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन मीदेखील करतो आहे. मात्र, यात माझी एक अट आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला आम्ही जेव्हा सांगत होतो, महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला घेऊन जात आहेत. त्यावेळी विरोध केला असता तर आज इथे मराठी माणसाच्या हिताचे सरकार बसले असते. केंद्रातदेखील हे सरकार बसले नसते. तेव्हा पाठिंबा द्यायचा आणि आता विरोध करायचा, हे चालणार नाही. महाराष्ट्राच्या हिताच्या विरोधात जो कोणी बोलेल, त्याचे आदरातिथ्य मी करणार नाही, त्याला घरी बोलवणार नाही, त्यासोबत पंगतीला बसणार नाही. हे आधी ठरवा आणि मग महाराष्ट्राच्या हिताच्या गोष्टी करा, असे सांगून उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणादरम्यान राज ठाकरे यांच्यासोबत युतीचे संकेत दिलेत. राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राजकारणात आणि खेळात कधी काय होईल हे सांगता येत नाही. राज ठाकरेंनी जे काही वक्तव्य केले मला माहिती नाही. ते दोघे भाऊ आहेत. ते एकत्रित येणार असेल तर आमचे काही म्हणणे नाही. महाराष्ट्रहितासाठी आम्हीदेखील सोबत होतो. शिवसेना कोणी हॅन्डल करायची हा त्या दोघा भावांचा विषय आहे, असे भरत गोगावले म्हणाले.
काय म्हणाले राज ठाकरे?
अजूनही तुम्ही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न महेश मांजरेकर यांनी विचारला. त्यावर उत्तर देताना राज ठाकरे म्हणाले की, कोणत्याही मोठ्या गोष्टींसमोर आमच्यातील वाद, भांडण छोटी आहेत. महाराष्ट्र खूप मोठा आहे. या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी आणि मराठी माणसाच्या अस्तिस्वासाठी ही भांडणं, वाद सर्व गोष्टी अत्यंत क्षुल्लक आहेत. त्यामुळे एकत्र येणे आणि एकत्र राहणे ही फार काही कठीण गोष्ट आहे, असे मला वाटत नाही, असे म्हणत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंशी युती करण्यात काहीही किंतू-परंतु नाहीत, हे स्पष्ट केले. राज ठाकरे पुढे म्हणाले की, हा विषय फक्त माझ्या एकट्याच्या इच्छेचा किंवा माझ्या स्वार्थाचा नसून, आपण महाराष्ट्राचा लार्जर पिक्चर पाहणे गरजेचे आहे. तो मी पाहतो. माझे म्हणणे आहे की सर्व राजकीय पक्षातील सर्व मराठी माणसांनी एकत्र येऊन एकच पक्ष काढावा. त्यातून महाराष्ट्राचा विकास साधावा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.
————
