– तहसीलदारांचे आदेश धाब्यावर; पहिल्याच रात्री पथक ‘मॅनेज’?
– रेतीचा काळा धंदा सुरूच; प्रशासन ‘पाठीशी’ की ‘पाठीमागे’?
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – तालुक्यातील खडकपूर्णा नदीपात्र आणि इतर नदीनाल्यांतून अवैध रेती उत्खननाचा गोरखधंदा दिवसाढवळ्या सुरूच आहे. हे थांबवण्यासाठी तहसीलदार अजित दिवटे यांनी विशेष ‘बैठे पथक’ नेमलं, पण धक्कादायक म्हणजे, हेच पथक पहिल्याच रात्री मॅनेज झाले असावे, असा संशय निर्माण झाला आहे. कारण, खुलेआम रेती उत्खनन व वाहतूक सुरूच असल्याचे दिसून आले आहे.
तालुका महसूल प्रशासनाने मोठ्या गाजावाजात जारी केलेले आदेश आणि नियम फक्त कागदांपुरतेच राहिले. नागरिकांच्या सातत्याने येणार्या तक्रारींनंतर तहसीलदारांनी तीन ठिकाणी पथक नेमले होते. निमगाव वायाळ, हिवरखेड पूर्णा आणि दुसरबीड, पण या पथकांनी रेती थांबवण्याऐवजी माफियांना खुलेआम ग्रीन सिग्नल दिला की काय, असा संशय निर्माण होत आहे. हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन प्रशासनाच्या मूक सहमतीने सुरू असल्याचे दिसून आले आहे. हिवरखेड पूर्णा येथील खडकपूर्णा नदीपात्रातील अवैध रेती उत्खनन थांबविण्यासाठी दिनांक ११ एप्रिल रोजी सायंकाळी ६ ते सकाळी ६ वेळेत एस.एस.चव्हाण म.ग्रा.अ., गोरख पवार, म.ग्रा.अ.पी., आर. सुरुशे म. से., एस. एम. पवार, म. से. यांना नेमण्यात आलेले होते. तसेच निमगाव वायाळ येथे व्ही आर शेळके महसुल ग्राम अधिकारी, ए. जी. गि-हे.म.ग्रा.अ., एस.ए. खरात.म.से., अविनाश तुपकर महसुल सेवक, तर दुसरबीड येथे एस.बी. थोरात म.ग्रा.अ., जि. वाय. दराडे, म.ग्रा. अ.संदीप किगरे महसूल सेवक, जी एस कुंटे महसूल सेवक यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र सदर ठिकाणी या पथकातील कर्मचार्यांनी आर्थिक देवाणघेवाण करून रेती तस्कराना अवैध रेती उत्खननाची परवानगी दिली असल्याचे जाणवले असून, एका रात्रीत हजारो ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झाल्याची माहिती ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’च्या हाती लागलेले फोटो आणि व्हिडीओ यातून उघड झाली आहे.
तहसीलदार अजित दिवटे यांनी दिलेल्या आदेशानुसार, पथकातील कर्मचार्यांनी दर दोन तासांनी आपले लोकेशन दाखवणारे फोटो तहसील कार्यालयात पाठवायचे होते. पण महसूलवाल्यांनीच जर काळ्या धंद्याशी हातमिळवणी केली, तर सामान्य नागरिकांनी कुणाकडे पाहावं? तहसीलदारांनी वरील तिन्ही ठिकाणच्या खडकपूर्णा नदीपात्रातून झालेले अवैध रेती उत्खननाची माहिती घेण्यासाठी स्थानिक तलाठी व मंडळ अधिकारी यांना पाठवून झालेल्या उत्खननाचे माहिती घेऊन व जर रेतीतस्करानी कुठे ही रेतीसाठे केले असल्यास त्याचे मोजमाप करून सदर ठिकाणी बोजा दाखल करण्याची आदेश दिले आहेत, व कारवाईचे संकेत दिले, पण तारीख ठरलेली नाही. याबाबत तहसीलदार अजित दिवटे यांना फोन केला असता त्यांना फोन उचलायचाही वेळ नाही, असे दिसून आले आहे.