– ‘कार्यसिद्धी प्रतिष्ठाण’च्या सौजन्याने आयोजन; सकल हिंदू समाज एकटवला!
पुणे (प्रतिनिधी) – हिंदू नववर्ष गुढीपाडवा सणाच्या निमित्ताने कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्या सौजन्याने रविवारी (दि.३०) सायंकाळी साडेपाच वाजता सकल हिंदू समाजाच्यावतीने आंबेगाव येथे भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत ‘कार्यसिद्धी’चे संस्थापक गिरीराजभाऊ तानाजीराव सावंत यांच्यासह प्रमुख मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. या रथयात्रेत प्रभू श्रीरामांच्या नामघोषाचा गजर करण्यात आला, तसेच पारंपरिक वेशभूषेत नागरिक, महिला-भगिनी सहभागी झाल्या होत्या. शहरवासीयांचा उत्साह अवर्णनीय होता. चिमुकल्यांनी पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
गुढीपाडवा हा मांगल्याचा सण तसेच हिंदूंचा नववर्ष शुभारंभ दिन आहे. यानिमित्त रविवारी सायंकाळी साडेपाच वाजता कार्यसिद्धी प्रतिष्ठाणच्या सौजन्याने व सकल हिंदू समाजाच्यावतीने श्री विठ्ठल मंदीर शनिनगर चौक ते विरंगुळा केंद्र, श्री विठ्ठल हेरिटेज सोसायटी, आंबेगाव रस्ता अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्रिमूर्ती चौक, सावंत विहार, अमित ब्लूमफिल्ड, शनिनगर, अय्यप्पा मंदीर, सिद्धीविनायक सोसायटी, टेल्को चौक आदी मार्गे ही शोभायात्रा गेली. या शोभायात्रेत परंपरागत वेशभूषेत महिला, युवक, सर्व जाती-पंथांच्या नागरिकांसह बहुसंख्य हिंदू बांधव सहभागी झाले होते. यावेळी प्रभू श्रीरामांचा नामघोष करण्यात आला. या शोभायात्रेत कार्यसिद्धी प्रतिष्ठाणचे संस्थापक गिरीराजभाऊ सावंत यांच्यासह सौ. राजेश्वरीताई गिरीराज सावंत, संजय प्र. राजाध्यक्ष, रमण ह. कुलकर्णी, निखिल हेर्लेकर, मकरंद आंबेटकर, प्रसाद वेलणकर, शैलेंद्र कृ. देशपांडे, प्रसाद होटे, डॉ. आशुतोष काळे, अजित खैरे, अंकुश डफळे आदी विविध मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
दक्षिण पुण्यातील सकल हिंदू समाजाच्या एकतेचे प्रदर्शन!
गुढी पाडवा हा हिंदूंचा पवित्र सण असून, हिंदूंचे नवे वर्ष सुरू होते. या पवित्र सणाच्या पृष्ठभूमीवर आंबेगाव, कात्रजसह दक्षिण पुण्यातील सकल हिंदू समाज या भव्य शोभायात्रेत सहभागी झाला होता. श्री विठ्ठल मंदीर शनिनगर चौक येथून सुरू झालेली ही शोभायात्रा साईदत्त निवास, ब्लूस्प्रिंग सोसायटी टेल्को चौकमार्गे गेली. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने हिंदू समाज बांधव सहभागी झाल्याचे दिसून आले. फ्लाइंग बर्डस् स्कूलच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि श्रीकृष्ण यांच्या जन्मसोहळ्याचे पथनाट्याद्वारे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकून घेतली. तसेच, महिला-भगिनींसह युवावर्गाचा उत्साह अवर्णनीय असा होता. यानिमित्ताने सकल हिंदू समाज एकवटल्याचे दिसून आले.