– शासकीय मोबदला मिळवून देण्यासाठी गोरगरीब शेतकर्यांकडून मागितली होती खंडणी?
– शेतकर्यांचा नेता म्हणविणार्या डिक्करविरोधात खंडणीप्रकरणात आणखी शेतकरी पुढे येण्याची शक्यता!
शेगाव/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – शेतकर्यांनी खंडणी उकळण्यासंदर्भात शुक्रवारी तक्रार नोंदविल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भप्रमुख राहिलेल्या प्रशांत डिक्कर याच्याविरोधात शेगाव पोलिसांत खंडणीचा गुन्हा दाखल करून त्याला लगेच अटक करण्यात आली होती. शनिवारी (दि.२२) प्रशांतला शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केले असता, न्यायालयाने त्याला दोन दिवस पोलिस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे डिक्करचा पोलिस कोठडीत मुक्काम चांगलाच वाढला असून, पोलिसांना डिक्कर याने शेतकर्यांकडून उकळलेले पैसे जप्त करायचे आहेत. दरम्यान, डिक्कर याने आणखीही बर्याच शेतकर्यांकडून प्रत्येकी पाच लाख रूपये उकळल्याची शक्यता असून, तेही शेतकरी लवकरच पोलिसांत तक्रारी दाखल करण्यासाठी पुढे येणार असल्याचे त्या भागातील शेतकरी सांगत आहेत. दरम्यान, शेतकर्यांची बाजू घेऊन याप्रकाराला सडेतोडपणे वाचा फोडल्याबद्दल शेगाव, खामगाव तालुक्यांतील अनेक शेतकर्यांनी व शेतकरी संघटनांच्या पदाधिकार्यांनी दूरध्वनी करून ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे आभार व्यक्त केले आहेत. दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेने डिक्कर याच्यापासून आता काखा वर केल्या आहेत. त्याचा आमच्याशी काही संबंध नसल्याचे संघटनेने प्रसिद्धी पत्रकाव्दारे कळवले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या प्रकल्पासाठी बाधित गाव नवीन ठिकाणी वसविण्यासाठी गावठाण क्षेत्राकरिता शासनाने शेतकर्यांच्या शेती घेतलेली आहे. त्यासाठी मोबदला शेतकर्यांना दिला जाणार आहे. मात्र हा मोबदला प्रतिहेक्टर ४० लाख रुपये मिळवून देतो, असे आमिष दाखवून शेतकर्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करीत आणखीन पैशासाठी शेतकर्यांचा नेता म्हणविणारा प्रशांत डिक्कर हा त्रास देत असल्याचा आरोप शेतकर्यांनी करीत, शुक्रवारी शेगाव येथील जिगाव प्रकल्पाअंतर्गत शेतकरी व अधिकार्यांच्या बैठकीमध्ये प्रशांत डिक्कर याला शेतकर्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आलेला होता. यावेळी डिक्कर याचे समर्थक काही लोकं तर लगेच पळून गेले होते. दरम्यान, संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी याबाबत शेगाव शहर पोलिसात तक्रार नोंदविली. यावरून प्रशांत डिक्कर याच्याविरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गंभीर गुन्हे दाखल करून त्याला कालच अटक करण्यात आली होती. शुक्रवारी रात्रभर पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर शेगाव पोलिसांनी आज, शनिवारी डिक्कर याला दुपारी शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून युक्तीवाद झाल्यानंतर न्यायालयाने प्रशांत डिक्कर याला दि. २४ मार्चपर्यंत तपासासाठी पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. शेगाव पोलिसांना आता डिक्कर याने शेतकर्यांकडून खंडणीपोटी उकळलेले पैसे जप्त करायचे असून, भरभक्कम पुरावे जमा करायचे आहेत.
जीवानिशी ठार मारून गायब करण्याचीही धमकी…??
संग्रामपूर तालुक्यातून आलेले हिंगणा कवठळ या गावाच्या सरपंचा पुष्पा मोरखडे, शेतकरी संदीप मोरखडे, हिरालाल मोरखडे, प्रफुल श्रीधर मोरखडे, मोहन श्रीपद उमाळे, प्रशांत अजाबराव बावस्कार व इतर शेतकर्यांनी शुक्रवारी शेगाव रेल्वे उड्डाण पुलाजवळ प्रशांत डिक्कर याची भेट घेतली होती. तेंव्हा तेथे डिक्कर हा शेतकर्याला म्हणाला की, मी तुम्हाला शासनाकडून प्रती एकरी ४० लाख रूपये मिळवून देण्यासाठी माझे कार्यकर्ते घेऊन शेगांव येथील जिगांव प्रकल्प कार्यालयात आंदोलन करण्यासाठी जात आहे, परंतु त्यासाठी तुम्हाला प्रतीएकरी मला ५ लाख रूपये द्यावे लागतील. सदर लाभासाठी प्रती एकरी ५ लाख रूपये रक्कम जास्त असल्याने आम्ही त्याला पैसे देण्यासाठी नकार दिला असता, त्याने आम्हाला धमकावले की, तुम्ही जर मला प्रती एकरी ५ लाख रूपये दिले नाही, तर मी तुमच्या विरोधात आंदोलन करुन तुम्हाला शासनाकडून पैसे भेटू देणार नाही. पैसे मिळवून देणे माझ्या हातात आहे. आम्हाला प्रशांत डिक्करवर विश्वास नसल्याने आम्ही त्याचे पाठीमागे शेगावला आलो व शेगाव उड्डाणपुलाचे अलीकडे त्याला भेटून आम्ही त्याला दिलेले ५ लाख रूपये परत मागितले, तेंव्हा तो आम्हाला म्हणाला की, मी तुमचे पैसे परत देऊ शकत नाही, मी तुमचे काम करुन देतो, परंतु मला अडचणीत आणून याबद्दल कोणाला सांगितले तर माझ्या कार्यकर्त्यांकडून तुम्हाला जीवानीशी ठार मारुन गायब करुन टाकीन, अशी जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे शेतकर्यांनी तक्रारीत नोंदविले आहे.
संतप्त शेतकरी डिक्करला हाणणार; तेवढ्यात पोलिस पोहोचले अन अनर्थ टळला!
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भ प्रमुख असलेला प्रशांत डिक्कर हा जिगाव प्रकल्पाच्या कार्यालयात पोहोचल्यानंतर तिथे शेतकरीही त्याच्या मागावर पोहोचले. या ठिकाणी डिक्कर याने ज्या शेतकर्यांनी मला पैसे दिले नाही त्यांना मोबदला देऊ नका, अशी भूमिका घेतली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व बोलचालीतून वाद निर्माण झाला, आणि त्यानंतर विषय हातापायीपर्यंत पोहोचला. मात्र याची कुणकुण आधीच शेगावचे ठाणेदार नितीन पाटील यांना लागल्यामुळे ते आपल्या पथकासह जिगाव प्रकल्प कार्यालयात पोहोचले. यावेळी शेतकरी आक्रमक होऊन डिक्कर याच्यावर संताप व्यक्त करण्याच्या तयारीत असतानाच, व झटापट चालू झाल्याबरोबर ठाणेदार पाटील यांनी परिस्थिती हाताळून प्रशांत डिक्कर याला ताब्यात घेऊन कार्यालयाबाहेर नेले व शेतकर्यांच्या तावडीतून त्याला सोडविले. या ठिकाणी पोलिस जर दहा मिनिटे उशिरा पोहोचले असते तर कार्यालयातच अनर्थ घडला असता, अशी चर्चा आता होऊ लागली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अजब पत्र…!
प्रशांत डिक्कर याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल होताच अचानकपणे स्वाभिमानी शेतकरी संघटनेला जाग आली आहे. या संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी २२ मार्च रोजी एक पत्र प्रसिद्ध दिले असून, या पत्रामध्ये प्रशांत डिक्कर हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष म्हणून काम करत होते. परंतु गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये जळगाव जामोद मतदारसंघातून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पक्षामध्ये प्रवेश करून स्वराज्य पक्षावर निवडणूक लढवली, तेव्हापासून ते आजपर्यंत त्यांचा कुठलाही संबंध संघटनेशी नाही, असे नमूद केले आहे. उल्लेखनीय म्हणजे, विधानसभा निवडणुकीला बराच काळ झालेला असतांनासुद्धा आजपर्यंत संघटनेकडून डिक्कर संदर्भात कुठलेही प्रसिद्धी पत्रक अथवा पक्षातून हकालपट्टी, पक्षाशी संबंध नाही असे पत्र जारी करण्यात आले नव्हते. मात्र आज खंडणीचा गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांच्याशी आमचा संबंध नाही, असे दाखविण्यात आले आहे. राजू शेट्टीच्या दुट्टपी व संशया स्पद भूमिकेबद्दल शेतकर्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. कारण डिक्कर युवा आघाडी विदर्भ अध्यक्ष असताना त्याच्याबद्दल जिल्ह्याध्यक्ष कसं काय पत्र काढू शकतात..? राजू शेट्टीनी भूमिका का जाहीर केली नाही..?? याविषयी शेतकर्यामध्ये उलटसुलट चर्चा आहे.
फेसबुकवर आजही प्रशांत डिक्कर हा ‘स्वाभिमानी’चाच!
प्रशांत डिक्कर याचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेशी संबंध नाही असा खुलासा आज संघटनेच्या जिल्हाध्यक्षांनी केला. संघटनेचे नाव कुणी त्यांच्याशी जोडले तर त्याचेविरुद्ध कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी पत्रात दिला. मात्र मागील तीन महिन्यांपासून प्रशांत डिक्कर याचे फेसबुक अकाउंटवर आजही तो स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विदर्भ अध्यक्ष आहे. मग ‘स्वाभिमानी’ला हे अजूनही दिसले नाही का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.