– तालुक्यातील शेतकरीपुत्रांचा मोठ्या संख्येने आंदोलनात सहभाग
– शेतकरी चळवळीला धार आणण्याचा व्यक्त केला निर्धार!
चिखली (महेंद्र हिवाळे) – शेतकरी आत्महत्येच्या वाढत्या घटनांमुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि शेतकर्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी आज (दि.१९) चिखलीत अन्नत्याग आंदोलन करण्यात आले. यावेळी आत्महत्या केलेल्या शेतकर्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी संवेदनशील शेतकरीपुत्रांनी एक दिवसीय अन्नत्याग केला. यावेळी तालुक्यातील असंख्य शेतकरीपुत्र उपस्थित होते.
१९ मार्च १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील चिलगव्हाण येथील शेतकरी साहेबराव पाटील करपे यांनी कुटुंबासह पवनार आश्रमात आत्महत्या केली होती. या घटनेला ३९ वर्षे पूर्ण झाले तरी शेतकरी आत्महत्या थांबल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर, शेतकर्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्रभर शेती समस्यांची जाणीव असलेले अनेक संवेदनशील सामाजिक कार्यकर्ते दरवर्षी १९ मार्चरोजी अन्नत्याग आंदोलन करतात. यावर्षीही हे आंदोलन महाराष्ट्र भर केले गेले. त्याचाच एक भाग म्हणून चिखली तालुक्यातील व परिसरातील दरवर्षी आंदोलन करणारे शेतकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते यावर्षीदेखील चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दि.१९ मार्चला सकाळी १२ वाजता एकत्र आले व हे आंदोलन करण्यात आले. आंदोलन पूर्णपणे सामाजिक स्वरूपाचे होते. जवळपास सर्वच पक्षातील शेतकरीपुत्र या आंदोलनस्थळी उपस्थित होते. पक्षविरहीत तथा राजकारण विरहीत असल्याने शेतकर्यांप्रती संवेदना व्यक्त करण्यासाठी शेतकरीदेखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी उपस्थितांनी आपले विचारदेखील मांडले, आणि शेतकर्यांसाठी एकत्रितपणे काम करण्यासाठी दिशा ठरविण्यात येणार असून, लवकरच एका बैठकीचे आयोजन करण्यात येणार असल्याचेदेखील यावेळी ठरविण्यात आले. शेतकर्यांच्या आत्महत्येचे सत्र अजूनही थांबलेले नाही. नुकतेच राज्य पुरस्कारप्राप्त युवा शेतकरी कैलास नागरेंनी आत्महत्या केली. त्यामुळे, शेतकर्यांच्या व्यथा अधिक तीव्र झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर, शासनाने शेतकर्यांच्या समस्यांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी आंदोलनाला पुन्हा पहिल्यासारखी धार आणावी!
एक दिवस एकत्र येऊन आणि उपवास करून थांबण्यापेक्षा शेतकरी स्वातंत्र्याची लढाई राजकीय पक्षांचे व संघटनांचे जोडे बाहेर काढून एकत्रितपणे लढण्याची तयारी करावी. शेतकरी आंदोलनाला पुन्हा पहिल्यासारखी धार आणावी, आणि राजकीय पदाधिकार्यांनी शेतकरी नेत्यांच्या पाठीमागे आपली ताकद उभी करून शेतकर्यांच्या समस्या सोडवण्यासाठी एकत्र यावे. सरकारकडून हवे ते पदरात पाडून घेता येईल, फक्त त्यासाठी एकजुटीने जोरदार लढा देण्याची गरज आहे. शेतकर्यांप्रती आपल्या भावना आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी संवेदनशील नागरिकांनी या आंदोलनात सहभाग नोंदवून शेतकर्यांच्या व्यथांना वाचा फोडण्यासाठी आपण संवेदनशील आहोत हे दाखवून दिले. आत्महत्या केलेल्या शेतकर्यांना श्रध्दांजली अर्पण करुन राष्ट्रगीताने आंदोलनाची सांगता करण्यात आली.