– खडकपूर्णा प्रकल्प व पाटबंधारे विभागाच्या प्रशासनाची पाणी वापर संस्थांच्या पदाधिकार्यांना ग्वाही!
– जिल्हाधिकार्यांच्या आदेशावरून पार पडली समन्वय सभा; बहुतांश प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हे!
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाणी वापर संस्थेच्या लाभक्षेत्रातील अपूर्ण कामे, त्यावरील उपाययोजना व सदर बाबतीत उद्भवणार्या अडीअडचणी याबाबत पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींसोबत खडकपूर्णा प्रकल्प अधिकार्यांसह पाटबंधारे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली. मे २०२५ पर्यंत प्रकल्पस्तरावरील अधिकार कक्षेतील कामे पूर्ण करण्याचे दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात येतील, सदर कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने शासनाकडे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवून सदर कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठोस आश्वासन याप्रसंगी अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाढे यांच्या समक्ष खडकपूर्णाचे कार्यकारी अभियंता अमोल चोपडे, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत संत, खडकपूर्णाचे उपविभागीय अधिकारी श्री जाधव यांनी पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींना दिले.
सविस्तर असे, की खडकपूर्णा प्रकल्पाचे उपसा जलसिंचन योजना टप्पा क्र. १ ते ४ वरील पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी वसुंधरा पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शेणफडराव घुबे व बळीराजा, जिजामाता, जय सेवालाल पाणी वापर संस्था व छत्रपती शिवाजी महाराज पाणी वापर संस्थेचे समन्वयक संचालक एकनाथ पाटील थुट्टे यांच्या नेतृत्वाखाली मलगी, रोहडा, कोलारा, अमोना, कोनड-येवता- देऊळगांव धनगर या पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांची भेट घेऊन आपल्या पाणी वापर संस्थांच्या लाभक्षेत्रातील अपूर्ण कामे पूर्ण करण्याच्या दृष्टीने व शेतकर्यांच्या सिंचना संबंधीच्या अडीअडचणी दूर करण्यासाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे अधिकारी व पाणी वापर संस्थांचे प्रतिनिधी यांची समन्वय सभा घेण्याबाबत मागणी केल्यावरून जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिनांक १७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११:०० ते २:०० या वेळेत गाढे अधीक्षक अभियंता पाटबंधारे प्रकल्प मंडळ बुलढाणा यांच्या कार्यालयात समन्वय सभा संपन्न झाली. या सभेमध्ये शेणफडराव घुबे, एकनाथ पाटील थुट्टे, राजू पाटील थुट्टे, अच्युतराव पाटील थुट्टे, विश्वनाथ सोळंकी, दिनकरराव घुबे यांच्यासह राजू जावळे, डॉ. विकास मिसाळ, पंजाबराव जावळे यांनी सहभाग घेतला. यामध्ये वसुंधरा पाणी वापर संस्था देऊळगाव घुबे, बळीराजा पाणी वापर संस्था भरोसा -देऊळगाव घुबे, जय सेवालाल पाणी वापर संस्था भरोसा -अंचरवाडी, छत्रपती शिवाजी महाराज पाणी वापर संस्था भरोसा, रामनगर – देऊळगाव घुबे, खंडोबा पाणी वापर संस्था देऊळगाव घुबे, कोनड व सिद्धेश्वर पाणी वापर संस्थेच्या लाभ क्षेत्रातील अपूर्ण कामे, त्यावरील उपाययोजना व सदर बाबतीत उद्भवणार्या अडीअडचणी यावर सखोल चर्चा करण्यात येऊन मे २०२५ पर्यंत प्रकल्प स्तरावरील अधिकार कक्षेतील कामे पूर्ण करण्याचे दृष्टीने तातडीने पावले उचलण्यात येतील व कांही महत्वाची व अत्यावश्यक कामाची नोंद घेऊन सदर कामे पूर्णत्वास नेण्याच्या दृष्टीने शासनाकडे सुधारित प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवून सदर कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ठोस आश्वासन अधीक्षक अभियंता बापूसाहेब गाढे यांच्या समक्ष अमोल चोपडे कार्यकारी अभियंता खडकपूर्णा प्रकल्प, प्रशांत संत कार्यकारी अभियंता लघू पाटबंधारे विभाग बुलढाणा, जाधव ऊप विभागीय अधिकारी खडकपूर्णा प्रकल्प उपविभाग देऊळगावराजा यांनी उपस्थित पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींना दिले.
या सभेसाठी खडकपूर्णा प्रकल्पाचे नरेश घुले, ज्ञानेश्वर शिवगण, श्रीमती काजल जाधव, संजय चांदोरकर, हरिदास पांडे, ऋषभ साखळीकर इत्यादी अधिकारी उपस्थित होते. या वेळी शेणफडराव घुबे, एकनाथ पाटील थुट्टे, दिनकरराव घुबे, विश्वनाथ सोळंकी यांनी आमच्या लाभक्षेत्रातील चार्या-मोर्यांची कामे अपूर्ण असल्यामुळे व कांही ठिकाणी गेट नादुरुस्त असल्यामुळे लाभधारक शेतकर्यांना सिंचनाचा लाभ घेता येत नाही, परिणामी शेतकरी पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ करतात व त्यामुळे वसुलीमध्ये अडचणी निर्माण होतात हे मुद्दे प्रकर्षाने मांडले. त्याचबरोबर कोनड खुर्द येथील शेतकर्यांच्यावतीने राजू जावळे व पंजाबराव जावळे यांनीसुद्धा आमच्या गांवातील लाभधारक शेतकर्यांना खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्याचा लाभ घेता आला नाही, असा मुद्दा उपस्थित केला असता, त्यांची मागणी नोंदवून घेऊन या शेतकर्यांना तात्काळ पाण्याचा लाभ देण्याबाबत निर्देश दिलेत. लाभधारक शेतकरी पाण्यापासून वंचित राहणार नाही, व पाण्याचा आपव्यय होणार नाही, याबाबतही सक्त ताकीद दिली. तसेच पाणी वापर संस्था सक्षम बनविण्याचे दृष्टीने पाणी वापर संस्थांचे अधिकार व त्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट करण्याच्या अनुषंगाने जनजागृती व्हावी, यासाठी दिनांक १८ ते २२ मार्च यादरम्यान जल सप्ताहाअंतर्गत कोलारा, भरोसा, येवता व देऊळगांव घुबे येथे जनजागृती सभा आयोजित करण्याबाबत शेनफडराव घुबे यांनी सूचना मांडली असता, सदर मागणी तात्काळ मान्य करुन सभा लावण्याचे अधीक्षक अभियंता गाढे यांनी तसे निर्देश दिले. Dाामच्या पाणी वापर संस्थांच्या प्रतिनिधींच्या अडचणी सोडविण्यासंबंधी आमचे म्हणने समजून घेऊन सदर प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने गाढे अधीक्षक अभियंता प्रकल्प मंडळ बुलढाणा यांनी खडकपूर्णा प्रकल्पाच्या प्रमुख अधिकारी वर्गासोबत चर्चा घडवून आणली व सर्व प्रश्नांची योग्य दखल घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याबाबत शेनफडराव घुबे यांनी श्री गाढे यांच्यासह, श्री संत, श्री चोपडे, श्री जाधव यांचे व उपस्थित अधिकारीवर्गांचे आभार मानले. तर पाणी वापर संस्थांचे सर्व अध्यक्ष व प्रतिनिधींनी तसेच ऊपस्थित सर्वांनी अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सभा पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबाबत समाधान व्यक्त करुन उपविभागीय अभियंता श्री जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. सभेच्या शेवटी चहापाणी झाल्यानंतर सर्वांच्याच चेहर्यावर कार्यपूर्तीचा आनंद व समाधान झळकत होता.