– रात्रीतून क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी उचलले!
– शेतकरी नेते रविकांत तुपकर भूमिगत; मुंबईतील आंदोलन होणारच तुपकरांनी ठणकावले!
– शेतकर्यांचे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणारे पोलिस कुणाच्या इशार्यावर काम करत आहेत?
बुलढाणा (बाळू वानखेडे) – सोयाबीन व कापसाची दरवाढ, पीकविमा, सरसकट कर्जमाफीसह इतर शेतकर्यांच्या मागण्यांसाठी उद्या (दि.१९) मुंबईत पुकारण्यात आलेल्या शेतकरी आंदोलनापूर्वीच राज्य सरकारने बुलढाणा पोलिसांना पुढे करून क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या जिल्हाभरातील सर्व पदाधिकार्यांना रात्रीच ताब्यात घेऊन हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. शेतकरी नेते विनायक सरनाईक, डॉ. ज्ञानेश्वर टाले, सहदेव लाड यांना रात्री झोपेतून उठवून ताब्यात घेण्यात आले, व पोलिस ठाण्यात बसवून ठेवण्यात आले. दरम्यान, शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या घरीदेखील मोठ्या प्रमाणात पोलिस धडकले असून, घराला अक्षरशः वेढा घातला आहे. तर तुपकर हे भूमिगत झाले असून, मुंबईतील उद्याचे आंदोलन होईलच, असे ठणकावून सांगितले आहे. विशेष म्हणजे, तुपकर हे मुंबईला जाऊ नयेत, साठी पोलिसांनी त्यांची गाडी व चालकालादेखील ताब्यात घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कसंही करून हे आंदोलन होऊ नये, यासाठी पोलिसांनी चांगलाच जोर लावला असल्याचे दिसून येत आहे.
शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या मुंबईतील आंदोलनामुळे राज्य सरकारच्या पायाखालची वाळू चांगलीच सरकल्याचे दिसून येत आहे. शेतकर्यांना कर्जमाफी देऊ असे आश्वासन देऊन हे सरकार सत्तेवर आले, पण या सरकारने शेतकर्यांच्या डोळ्यात धूळ फेक करत कर्जमाफी देण्यास नकार दिला आहे. तसेच, हक्काचा पीकविमा, सोयाबीन व कापसाचा भाव फरक व दरवाढ या शेतकर्यांच्या मागण्यांदेखील सरकार पूर्ण करायला तयार नाही. त्यासाठीच राज्यभरातील शेतकरी उद्या मुंबईत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात धडकणार असून, हे आंदोलन चिरडून टाकण्याचा अयशस्वी प्रयत्न राज्य सरकारने बुलढाणा पोलिसांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केला आहे. जिल्हाभरातील प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी यांची यादी बुलढाणा पोलिसांनी दोन दिवसांपूर्वीच केली होती. त्यानुसार, हे सर्व कार्यकर्ते काल रात्री व आज पहाटे उचलण्यात आले आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील सातळी येथील युवा कार्यकर्ते अक्षय पाटील, वैभव जाणे, अजय गिरी यांना रात्री साडेबारा वाजता ताब्यात घेण्यात आले असून, देऊळगावराजा तालुक्यातील तुपकरांचे खंदे समर्थक शेख जुल्फेकार शेठ यांच्यासह त्यांच्या सहकार्यांनादेखील रात्रीच ताब्यात घेण्यात आले आहे. मोताळा तालुक्यातील उमेशसिंह रजपूत, प्रदीप शेळके, बंडूभाऊ देशमुख यांना रात्री दोन वाजता ताब्यात घेण्यात आले. क्रांतीकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. ज्ञानेश्वर टाले यांच्यासह त्यांच्या मेहकर तालुक्यातील सहकार्यांना रात्री साडेचार वाजताच ताब्यात घेऊन मेहकर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. मेहकर तालुकाध्यक्ष गणेश गारोळे, हरी आसबे, आत्माराम बंगाळे, समाधान गाडे यांच्यासह कार्यकर्त्यांनादेखील रात्री साडेचार वाजता मेहकर पोलिसांनी उचलून ताब्यात घेतले होते.
शेतकरी नेते विनायक सरनाईक यांना सकाळी पाच वाजता त्यांच्या चिखली तालुक्यातील शेलगाव जहागीर येथील घरून झोपेतच ताब्यात घेण्यात आले व चिखली पोलिस ठाण्यात बसविण्यात आले. त्यांच्यासह भगवानराव मोरे, भारत वाघमारे, सतिष सुरडकर, जीवन वाघमारे, प्रल्हाद देवढे, रवी टाले, भारत गाढवे यांनादेखील ताब्यात घेण्यात आले होते. या सह रायपूर, अंढेरा, अमडापूर पोलिस ठाणेहद्दीतील अनेक कार्यकर्त्यांनादेखील ताब्यात घेण्यात आले होते. शेतकरी नेते सहदेव लाड यांनादेखील बिबी पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले असून, त्यांना बिबी पोलिस ठाण्यात आणण्यात आले होते. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत पोलिसांनी क्रांतीकारी शेतकरी संघटनेच्या सर्वच प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते यांची धरपकड केली असून, कळस म्हणजे, मुंबईकडे ज्या गाड्या जाणार होत्या, त्या गाड्यांच्या ड्रायव्हरलादेखील ताब्यात घेण्यात आले आहे.
राज्य सरकार घाबरले; नागपूर दंगलीच्याआडून शेतकरी चळवळ मोडित काढायला निघाले?
काल रात्री नागपुरात मोठी जातीय दंगल झाली. या दंगलीच्या आडून कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या नावाखाली शेतकर्यांच्या आंदोलनाला रोखण्याचा प्रयत्न राज्यातील फडणवीस सरकारने केला आहे. तथापि, शेतकरी नेते रविकांत तुपकर हे भूमिगत झालेले असून, उद्याचे मुंबईतील आंदोलन होणारच असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. दरम्यान, आज सकाळी शेतकरी नेत्या अॅड. शर्वरीताई तुपकर यांनी शिवनी अरमाळ येथे जाऊन कैलास नागरे यांना आदरांजली अर्पण केली व शेतकर्यांच्या आंदोलनाला चिरडण्याचा हे सरकार प्रयत्न करत असल्याबद्दल तीव्र निषेध व्यक्त केला. चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे राज्य सरकारच्या तिजोरीत पैसा उरलेला नाही, मुंबईतील शेतकर्यांचे आंदोलन झाले तर शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर सर्वांचे लक्ष जाईल, म्हणून हे सरकार घाबरले आहे. परंतु, राज्यभरातील शेतकरी हे आंदोलनावर ठाम असून, कर्जमुक्ती घेतल्याशिवाय शांत बसणार नाही, असेही त्यांनी राज्य व केंद्र सरकारला ठणकावले आहे. दरम्यान, शर्वरीताई तुपकर या पोलिसांच्या नजर कैदेत असून, सकाळी शिवणी अरमाळ येथे जातानादेखील मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त त्यांच्यासोबत होता.