– कैलास नागरेंची आत्महत्या हा भाजप-युती सरकारने घेतलेला बळी – हर्षवर्धन सपकाळ
– नागरे यांची आत्महत्या नसून निर्ढावलेल्या शासनाने केलेला खून – रविकांत तुपकर
– शेतकरी नेते रविकांत तुपकरांना रडताना पाहून शेतकरी गहिवरले!
सिंदखेडराजा (सुरेश हुसे) – खडकपूर्णाचे पाणी लाभक्षेत्रातील शेतशिवारात खेळावे व हा भागदेखील सिंचन समृद्ध व्हावा, यासाठी लोकशाही मार्गाने लढा उभा करूनही गेंड्याची कातडी पाघरलेली प्रशासकीय यंत्रणा व निगरगट्ट भाजप-महायुतीच्या सरकारने कोणतीही दखल न घेतल्याने शिवनी अरमाळ येथील युवा शेतकरी कैलास नागरे यांनी आज (दि.१३) सकाळी विषारी औषध पिवून आत्महत्या केली होती. दिवसभराच्या तणावानंतर व प्रशासनासह विविध मान्यवरांच्या मध्यस्थीनंतर दुपारी पाच वाजेच्या सुमारास स्व. नागरे यांच्या पार्थिवावर अतिशय शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी मोठ्या संख्येने शेतकरी व मायमाऊल्या उपस्थित होत्या. स्व. नागरे यांच्या दोन मुली, पत्नी, मुलगा, आई व बहिणींनी फोडलेल्या टाहोमुळे प्रत्येकाच्या हृदयाला पाझर फुटला होता. शेतकर्यांच्या भल्यासाठी कैलास नागरे यांनी प्राणाची आहुती दिल्याने शिवनी अरमाळच नाही तर संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत होती, तसेच शेतकर्यांच्या संतापाचा उद्रेक दिसून आला. आज होळीच्याच दिवशी ही घटना घडल्याने शिवनी अरमाळ गावात चूल पेटली नाही, की सणावाराचं काही गोडधोड बनलं नाही. पेटलेल्या चितेकडे पाहून ग्रामस्थांसह माय-माऊल्यादेखील डोळ्याच्या कडा पुसताना दिसून आल्या. शेतकरी नेते रविकांत तुपकर, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनादेखील आपले दुःख सावरता आले नाही. तेदेखील ढसाढसा रडले.

अतिशय शोकमग्न आणि राज्य सरकारविषयाच्या संतापात वैâलास नागरे यांच्या पार्थिवावर सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले. याप्रसंगी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, शेतकरी नेते रविकांत तुपकर, प्रकाश गिते, दादाभाऊ खारडे, भगवानराव मुंढे, अॅड. शर्वरीताई तुपकर, विनायकराव सरनाईक, बालाजी सोसे, गजानन जायभाये, कृष्णा सपकाळ, देऊळगावराजाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी मनिषा कदम, देऊळगावराजाच्या तहसीलदार वैशाली डोंगरजाळ, अंढेराचे ठाणेदार रूपेश शक्करगे यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व परिसरातील मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते. दरम्यान, तरूण शेतकरी कैलास नागरेची आत्महत्या हा भाजपा-युती सरकारने घेतलेला बळी आहे. त्यांना आत्महत्या करायला भाग पाडणार्या प्रशासकीय अधिकार्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करा. आश्वासन देऊनही खडकपूर्णा धरणाच्या डाव्या कालव्यातून शेतीला पाणी न देणारे युती सरकार शेतकरीविरोधी असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तर स्व. नागरे यांची ही आत्महत्या नसून, निर्ढावलेल्या शासनाने केलेला हा खून आहे. त्यामुळे राज्य सरकारवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, अशी टीका शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी केली.
“जो पर्यंत मी केलेल्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात सरकार ठोस आश्वासन देत नाही, तोपर्यंत माझा मृतदेह ताब्यात घेऊ नका.” असं या शेतकऱ्याने आत्महत्या करण्याआधी चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. अंगावर शहारे आणि काटे आणणारी ही घटना आहे. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे उलटून गेली, मात्र आजही जर शेतकऱ्यांना व्यवस्थेच्या किंवा सरकारच्या नाकर्तेपणामुळे चिठ्ठी लिहून आत्महत्या करावी लागत असेल, तर यापेक्षा मोठे दुर्दैव नाही. कैलास नागरे यांचं बलिदान आम्ही कदापि वाया जाऊ देणार नाही. कैलास नागरे यांच्या पश्चात पूर्ण ताकदीने आम्ही त्यांचा लढा पुढे घेऊन जाऊ. आमच्याकडून त्यांच्याप्रती वाहिलेली हीच खरी श्रद्धांजली असेल.
– रविकांत तुपकर, शेतकरी नेते
राज्यातील भाजप महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य जनता व शेतकरी, कष्टकरी यांचे नसून ते फक्त मूठभर उद्योगपती व कंत्राटदारांचे आहे. शेतमालाला भाव नाही, शेतीला वीज, पाणी नाही म्हणून शेतकरी त्रस्त आहे, पण कुंभकर्णी झोपेतील सरकारला ते दिसत नाही. बुलढाणा जिल्ह्यातील देऊळगावराजा तालुक्यातील शिवनी आरमाळचा तरुण शेतकरी कैलास नागरेनी केलेली आत्महत्या ही भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचे उदाहरण आहे. कैलास नागरेच्या आत्महत्येस भाजपा सरकारच जबाबदार असून, हा सरकारी बळी आहे, असा गंभीर आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. कैलास नागरे यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी ते म्हणाले, कैलाश नागरे यांच्या निधानाचे वृत्त अत्यंत दु:खद आहे. त्याच्यांशी आपला अनेक वर्षांपासून स्नेह होता. नागरे हे प्रगतीशील शेतकरी आणि सामाजिक जाणिव असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी शेतीमध्ये अनेक चांगले प्रयोग केले होते मी माझ्या मुलाला तुझी शेती पहायला पाठवतो असे त्यांना सांगितले होते. माझ्या मुलाला आदर्श म्हणून दाखवलेला माणूस अशा प्रकारे आपल्यातून निघून जातो हे अत्यंत वेदनादायी आहे. राज्य शासनाचा युवा शेतकरी पुरस्कार मिळालेल्या शेतकर्याला होळीच्या सणाच्या दिवशी विषारी औषध पिऊन जीवन संपवावे लागले ही महाराष्ट्राला लाज आणणारी बाब आहे. शेतकरी हा अन्नदाता आहे पण त्याच्या ताटातच अन्न नसेल तर तो आपल्या कुटुंबाचे पोट कसे भरेल.
कैलास नागरे या तरुण शेतकर्याने आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानाची नोट लिहून शेतकर्यांना भेडसावणार्या समस्यांचा पाढा वाचला आहे. कैलाश नागरे यांनी खडकपूर्णाच्या डाव्या कालव्यातून शेतकर्यांना पाणी द्यावे म्हणून डिसेंबर महिन्यात सात दिवस अन्नत्याग आंदोलन केले होते. त्यावेळी प्रशासनाने पाणी सोडण्याचे आश्वासन दिले होते पण तीन महिने उलटूनही पाणी मिळत नसल्याने नागरे निराश झाले होते व त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले. सरकारला आपल्या राज्यातील शेतकर्यांच्या पिकाला पाणीसुद्धा उपलब्ध करुन देता येत नाही हे अत्यंत लाजीरवाणे व वेदनादायी आहे. एक तरुण शेतकरी आपले आयुष्य संपवतो याहून दुसरे दुर्दैव काय, पण सत्तेत बसलेल्यांना फक्त हिंदू, मुस्लीम, औरंगजेब याच्यापलीकडे काही दिसतच नाही. हे सरकार मुर्दाड आहे, मुजोर आहे क्रूरकर्मा औरंजेबापेक्षा निष्ठूर आहे, या सरकारचा जेवढा निषेध करावा तेवढा कमीच आहे, अशी टीकाही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली.
कैलास नागरेंच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्या – हर्षवर्धन सपकाळ
कैलास नागरे या तरुण शेतकर्याच्या आत्महत्येने सरकारने खडबडून जागे व्हायला हवे पण तसे होताना दिसत नाही. कैलास नागरेची आत्महत्या ही छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्राला शमरेने मान खाली घालायला लावणारी आहे. सरकारमध्ये थोडीफार लाज शरम शिल्लक असेल तर त्यांनी कैलास नागरे यांच्या आत्महत्येला जबाबदार अधिकार्यांवर कठोर कारवाई करून नागरे यांच्या कुटुंबाला भरीव आर्थिक मदत द्यावी व महाराष्ट्रात पुन्हा कोणी कैलास नागरे आत्महत्या करणार नाही, याची खबरदारी घ्यावी असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.
शेतकर्यांच्या ‘जलसमृद्धी’साठी ‘युवा शेतकरी पुरस्कार’प्राप्त कैलास नागरे यांचे आत्मबलिदान