– आगीने लघु व्यावसायिकांना आणले रस्त्यावर!
– माजी आ.डॉ. संजय रायमुलकरांचा मदतीचा हात; प्रत्येकी १० हजाराची दिली आर्थिक मदत!
मेहकर/बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – अचानक आग लागून लघु व्यवसायिकांची नऊ दुकाने या आगीत बेचिराख झाली. यामध्ये जवळजवळ २१ लाख रूपयांचे नुकसान झाले. त्यामुळे हे लघु व्यवसायिक रस्त्यावर आले आहेत. ही घटना तालुक्यातील डोणगाव येथील आठवडी बाजारात काल, दि. १० मार्चरोजी सकाळी ३ वाजे दरम्यान घडली. याबाबतची माहिती माजी आमदार डॉ.संजय रायमुलकर यांच्या कानी पडताच त्यांनी तातडीने घटनास्थळ गाठत, आगग्रस्तांना आपल्या पदरची प्रत्येकी १० हजार रुपये आर्थिक मदत देऊन काहीसा धीर दिला.
मेहकर तालुक्यातील डोणगाव येथील आठवडी बाजारातील दुकानांना १० मार्चच्या पहाटे तीन वाजेदरम्यान अचानक आग लागली. सदर आगीची माहिती मिळताच, भाजीपाला व्यावसायीक यांनी तात्काळ पोलिसांना कळविले. पोकॉ पवन गाभणे, हर्ष सहगल, पोहेकॉ मंगेश खडसे, ज्ञानेश्वर घायाळ, होमगार्ड नजीम शहा यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. वायरमन सादिक बागवान यांनी त्या परिसरातील वीज कनेक्शन खंडित केले, तर सुनील आखाडे यांनी तात्काळ टँकर बोलवून उपस्थितांच्या मदतीने आग आटोक्यात आणली. आगीची माहिती महसूल विभागाला समजताच तहसीलदार नीलेश मडके तसेच तलाठी अमोल राठोड, अनुप नरोटे, पल्लवीसह महसूल कर्मचारी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. यावेळी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष शैलेश सावजी, शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख निंबाजी पांडव, माजी सभापती राजेंद्र पळसकर, सरपंच चरण आखाडे, उपसरपंच श्याम इंगळे, हमिद कुरेशी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.

या आगीमध्ये शेख शौकत शेख सोनाजी बागवान यांचे ७५ हजाराचे नुकसान झाले. तसेच शकील शहा महेबूब शहा यांचे १ लाख, शेख ईसाक शेख युसूफ यांचे ६ लाख १५ हजार, शांताबाई पांडव व गजानन गाभणे यांचे १ लाख १० हजार, विनोद अशोक वाघमारे यांचे २ लाख ६० हजार, गणेश अशोक वाघमारे यांचे ३ लाख ६० हजार, शेख तौफिक शेख रहीम १ लाख ५० हजार, लक्ष्मण दत्तात्रय महापुरे ३ लाख ५० हजार, शेख इब्राहिम शेख संदल यांचे १ लाख रूपये असे एकूण २० लाख २१ हजार रुपयांचे नुकसान झाले. होळीचा सण समोर असल्याने जनरल स्टोअर्सवाल्यांनी तसेच भाजीपाला व्यावसायाकांनी कांदे, लसूणसह इतर जास्तीचा माल भरला होता. तर याबाबतची माहिती समजताच माजी आमदार डॉ. संजय रायमुलकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली व आगग्रस्तांना आपल्या पदरची प्रत्येकी १० हजार रुपयाची आर्थिक मदत देऊन काहीसा धीर दिला व शासनाकडून मदत मिळण्यासाठी पाठपुरावा करतो, अशीही ग्वाही दिली. यावेळी डॉ. गजानन उलामाले, राजेंद्र पळसकर, हेमराज शर्मा, संजय पळसकर, कय्यूम बागवानसह आदी उपस्थित होते.