– कॉपीमुक्त परीक्षेचा जालन्यात बोजवरा; कॉप्या पुरविण्यासाठी उडाली झुंबड!
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – इयत्ता दहावीच्या आजपासून सुरू झालेल्या परीक्षेला पहिल्याच दिवशी गालबोट लागले. मराठी विषयाचा पहिला पेपर सुरू होताच, तो अवघ्या १५ मिनिटांत फुटला. या पेपरचे झेरॉक्स काढून वाटण्यात आल्या व प्रश्नांच्या उत्तरे देण्यासाठी एकच झुंबड उडाली. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. विशेष म्हणजे, झेरॉक्सवाल्यांनी उत्तरपत्रिकेची एक झेरॉक्स तब्बल २० रूपयांत विकून बक्कळ कमाई केली.
आज इयत्ता दहावीच्या परीक्षेचा मराठी विषयाचा पेपर होता. सकाळी ११ वाजता पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच बदनापूर शहरातील सीएसी केंद्रांवर उत्तरपत्रिकाची झेरॉक्स मिळत असल्याचे समोर आले. त्यानंतर या कॉप्या पुरविण्यासाठी एकच झुंबड उडाली. पेपर सुरू झाल्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच प्रश्नपत्रिका परीक्षा केंद्राच्या बाहेर आल्याने शहरातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात होत्या. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॉपीमुक्त परीक्षेचा पुरता बोजवरा उडाला असल्याचे दिसून आले. मराठीची ही उत्तरपत्रिका नजीकच्या छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा जिल्ह्यातही पोहोचली असल्याचे चर्चेतून कळते आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही कॉपीबहाद्दरांनी संधी साधल्याचे कळते. त्यामुळे बोर्डाकडून ही प्रश्नपत्रिका रद्द करुन पुन्हा परीक्षा घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
कॉपी पुरविण्यासाठी तरूणांची हुल्लडबाजी!
जालन्यातील मंठा तालुक्यातील तळणी येथे विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले. परीक्षा केंद्राबाहेर बाहेर तरूणांची हुल्लडबाजी व्हिडिओत कैद झाली आहे. तळणी गावातील जिल्हा परिषदेच्या परीक्षा केंद्रावरच हा प्रकार सुरू होता. त्यामुळे आतमध्ये परीक्षा देणार्या परीक्षार्थींना बाहेरील गोंधळाचा त्रास सहन करावा लागला.
या संदर्भात विभागीय शिक्षण मंडळाच्या सचिव डॉक्टर वैशाली जामदार यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना माहिती दिली. छत्रपती संभाजीनगर शिक्षण मंडळाच्या वतीने संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवण्यात आला आहे. या प्रकरणाचे कोणी दोषी असेल त्यांच्यावर नियमानुसार कारवाई केली जाणार असल्याचेही जामदार यांच्या वतीने सांगण्यात आला आहे.