– राज्यात अजूनही २८ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट बाकी!
– ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण केलेल्या जिल्ह्यांना पुन्हा वाढीव उद्दिष्ट; बुलढाणा जिल्ह्याचेही एक लाखाने वाढवले!
– शेतकर्यांचा मात्र मुदतवाढीसाठी जीव टांगणीला!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – नाफेडच्या सोयाबीन खरेदीची आज, दि.६ फेब्रुवारीरोजी मुदत संपली असून, बरेच शेतकर्यांची सोयाबीन खरेदी बाकी असल्याने बहुतांश खरेदी केंद्रांवर वाहनांच्या आजही रांगा पाहायला मिळाल्या. राज्यात सद्याही २८ लाख क्विंटल सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट बाकी आहे. एकीकडे मुदत संपली असताना दुसरीकडे, ९० टक्के उद्दिष्ट पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना संबंधित विभागाकडून मात्र काल वाढीव खरेदीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यामुळे शेतकर्यांमध्ये तीव्र रोष व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, वाढीव उद्दिष्ट दिल्याने शेतकर्यांना मात्र मुदतवाढीची आस लागल्याचे दिसत आहे. दरम्यान, याबाबत रात्री उशिरापर्यंत मंत्रालयस्तरावर वेगवान घडामोडी सुरू असून, मुदतवाढीबाबत आज रात्री उशिरा निर्णय होण्याची शक्यता संबंधित उच्चपदस्थ सूत्रांकडून व्यक्त केली जात आहे.
बाजारभावाच्या तुलनेत सोयाबीनला प्रतिक्विंटल हजार ते बाराशे रूपये भाव जादा मिळत असल्याने राज्यातील शेतकर्यांनी मोठ्या संख्येने नाफेडकडे सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी केली होती. दरम्यान, विविध कारणांनी सदर खरेदी उशिरा सुरू करण्यात आली. मध्यंतरी बारदाण्याचादेखील अडथळा निर्माण झाल्याने बरेच दिवस खरेदीदेखील बंद राहिली. आतापर्यंत राज्यात जवळपास ७७ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी झाली असल्याची माहिती आहे. राज्याचे सोयाबीन खरेदीचे उद्दिष्ट एक कोटी क्विंटलच्यावर असल्याने अजूनही २८ लाख क्विंटल सोयाबीन खरेदी करण्याचे उद्दिष्ट बाकी आहे. सदर सोयाबीन खरेदीची मुदत दि. ३१ जानेवारीला संपली होती. परंतु याबाबत चोहीकडून रोष व्यक्त होत असताना आवाजही उठवला गेल्याने पणन मंत्री जयप्रकाश रावल यांच्याकडून सदर मुदत दि. ६ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली होती, व सदरची मुदत आज संपली आहे. एकीकडे, सोयाबीन खरेदीची मुदत संपली असतानाच व अगोदरचेच उद्दिष्ट बाकी असताना राज्यातील ९० टक्के खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झालेल्या जिल्ह्यांना मात्र पुन्हा काल, दि. ५ फेब्रुवारीरोजी खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले आहे.
यामध्ये बुलढाणा जिल्ह्यालाही एक लाख क्विंटल खरेदीचे उद्दिष्ट वाढवून देण्यात आले. पहिलेच उद्दिष्ट बाकी अन् त्यात पुन्हा उद्दिष्ट वाढून दिले, मात्र खरेदीची मुदत न वाढवल्याने याचा उपयोग काय? असा सवाल विचारला जात असून, शेतकर्यांकडून याबाबत नाराजी व रोषसुद्धा व्यक्त केला जात आहे. शासनाकडून बाजारपेठेत शेतमालाला कवडीमोल भाव मिळत असल्याने व नाफेडही आता कुचंबना करत असल्याने शेतकरी पुरता त्रस्त झाला असून, शासनाने संपूर्ण सोयाबीन खरेदी होईपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी रास्त मागणी शेतकरीवर्गाकडून केली जात आहे. याबाबत संबंधित मंत्रालयाकडून खरेदी बाबतची जिल्हानिहाय आकडेवारी घेणे सुरू असून, खरेदीच्या मुदतवाढीबाबत आज रात्रीच निर्णय होण्याची शक्यता आहे, असे उच्चपदस्थ अधिकारी सूत्रांकडून समजले आहे.
सोयाबीन खरेदीला महिनाभराची मुदतवाढ द्या; नाहीतर उरलेलं सोयाबीन मुंबईच्या समुद्रात नेऊन फेकू!