– अत्यंत थरारक सामन्यात सोलापूरच्या महेंद्र गायकवाडला लोळविले!
– महाराष्ट्र केसरी स्पर्धेला गालबोट; पराभवानंतर शिवराज राक्षेचा राडा, पंचाला लाथा हाणल्या!
अहिल्यानगर (विशेष प्रतिनिधी) – अतिशय चुरशीच्या व चित्ताथरारक झालेल्या लढतीत अखेर पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा ६७ वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याचा अंतिम सामन्यात अत्यंत थरारक पद्धतीने पराभव केला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा अतिशय रंगतदार ठरला. दोन्ही पैलवान ताकदवान असल्याने हा सामना जास्त रंगात आला. यानंतर त्याच्या समर्थकांनी मैदानात जोरदार जल्लोष केला. दरम्यान, या स्पर्धेला गालबोटदेखील लागले. गादी विभागाच्या उपांत्य फेरीत नांदेडचा शिवराज राक्षे याचा पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळने पराभव केल्यानंतर राक्षेने पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करत, त्यांना लाथ मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला. यानंतर बराच गोंधळ उडाला होता.
अहिल्यानगरमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली. आज (२ फेब्रुवारी) महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहळ यंदाच्या महाराष्ट्र केसरीचा मानकरी ठरला. पैलवान पृथ्वीराज मोहळने पैलवान महेंद्र गायकवाडवर मात करत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला आहे. गादी विभागामधून नांदेडचा शिवराज राक्षेविरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात उपांत्य सामने पार पडले. गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ अंतिम सामन्यात पोहोचला. तर माती गटातून महेंद्र गायकवाड हा अंतिम सामन्यात पोहोचला. यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला. या सामन्याला उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचीदेखील उपस्थिती होती.
अहिल्यानगरमधील वाडिया पार्क मैदानात ही स्पर्धा झाली. सुरूवातीला पैलवान शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यातील उपांत्य फेरीनंतर कार्यक्रमात मोठा गोंधळ उडाला. शिवराज राक्षे याने पराभवानंतर पंचांना लाथ मारली होती. त्यामुळे मोठा राडा झाला होता. या राड्यानंतर थोड्या वेळाने अंतिम सामना खेळवण्यात आला. ‘मी डबल महाराष्ट्र केसरी आहे, तिसर्यांदा होणार होतो, माझ्यावर अन्याय झाला,’ असा आरोप राक्षेने केला आहे. तर, ‘दोन्ही मुले आमचीच आहेत. पंचांनी जर निकाल चुकीचा दिला असेल तर राग येऊ शकतो. त्याचे वर्ष वाया गेले ना? वर्षभर तयारी केलेली असते, त्या रागातून असे घडू शकते. जर त्याचे खांदे टेकले नसतील आणि पाठ टेकली नसेल तर असे घडू शकते,’ असे ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक काका पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.