– छत्रपती संभाजीनगर येथे कर्करोगाशी झुंज संपली; रूग्णालयातच घेतला अखेरचा श्वास
सोलापूर (हेमंत चौधरी) – माजी न्यायमूर्ती, ज्येष्ठ साहित्यिक, गांधीवादी विचारवंत न्या. नरेंद्र चपळगावकर यांचे (वय ८८) शनिवारी पहाटे रुग्णालयात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांचे छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्य होते. ते मूळचे अक्कलकोट तालुक्यातील चपळगावचे होतं. त्यांच्या निधनाबद्दल चपळगाव येथे तीव्र दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. चपळगावकर गेल्या काही महिन्यापासून कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित कन्या, नातवंडे असा परिवार आहे.
न्या. चपळगावकर यांचे शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने बीड येथे स्थलांतर झाले. तब्बल १६ वर्षे त्यांनी बीड येथे वकिली केली. म्हणून ते बीडचेच रहिवासी म्हणून ओळखले जातात. बीड, आणि छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथे त्यांना वास्तव्य करावे लागले. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा आणि तीन मुली असा परिवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती म्हणून ते निवृत्त झाले. त्यांनी लोकाभिमुख असे न्यायनिवाडे दिले. त्यांच्यावर गांधीवादी विचारांचा प्रभाव होता. साहित्यिक म्हणूनही त्यांनी विपुल लेखन करुन नावलौकिक मिळविला होता. वर्धा येथील अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही चपळगावकर यांनी भूषविले होते. न्यायदान आणि साहित्य क्षेत्रात त्यांचे अतुलनीय योगदान आहे. एक गांधीवादी विचारवंत म्हणून त्यांना सारा महाराष्ट्र ओळखतो. पत्रकारिता, लेखन, अध्यापन आणि न्यायसंस्था अशा विविध क्षेत्रात कार्य करुन न्या. चपळगावकर यांनी कर्तृत्वाचा ठसा उमटविला होता.