– मराठा आरक्षण तातडीने लागू करा; मराठा समाज आक्रमक!
– शिंदे-फडणवीस सरकारपुढे आता मराठा आरक्षणाचे आव्हान!
औरंगाबाद (विजय चिडे) – आरक्षणासाठी मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झाला असून, तीव्र आंदोलन पुकारले गेले आहे. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील भांबेरी या गावातून आंदोलनाची ही ठिणगी पेटली आहे. हे संपूर्ण गावच आरक्षणाच्या मागणीसाठी आज रस्त्यावर उतरले होते. ग्रामस्थ बेमुदत उपोषणदेखील सुरू करणार आहेत. भांबेरी गावातील गावकर्यांनी तसेच तरुणांनी एकत्र येत मोठी रॅली काढली. या रॅलीत बैलगाडी ट्रॅक्टरसह हजारो मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा, जय भवानी जय शिवाजी’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
आज बेमुदत उपोषण आंदोलनाची पूर्वतयारी म्हणून सरकारला जागे करण्यासाठी हे आंदोलन होते, असे सांगण्यात आले. गावातील छत्रपती चौक ते श्रीक्षेत्र अडभंगनाथ मंदीर अशी मोठी रॅली निघाली. गावातील सर्व बैलगाड्या, गावातील शेतकरी खांद्यावर औजारे घेऊन, गावातील सर्व ट्रॅक्टर, मोटारसायकल आणि संपूर्ण गावातील मुले, मुली, महिला, पुरूष, तरुण, वृध्द हजारोंच्या संख्येने या मराठा आरक्षण रॅलीत सहभागी झाले. यावेळी मराठा आरक्षणासह विविध मागण्या करण्यात आल्या. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे, या प्रमुख मागणीसह कोपर्डीतील बहिणीला न्याय मिळाला पाहिजे, मराठा बांधवांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे तातडीने मागे घेण्यात यावेत, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. दरम्यान, केलेल्या मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर येत्या क्रांतीदिनापासून, 9 ऑगस्टपासून संपूर्ण गाव आमरण उपोषणाला बसणार, असा इशाराही यावेळी भांबेरी गावातील मराठा बांधवांनी दिला.
ईएसबीसी २०१४ आणि एसईबीसी २०१८ हे दोन्ही कायदे रद्द झाल्यामुळे नियुक्तीपासुन वंचित राहिलेल्या मराठा तरुणांना सुपरन्युमरी पद्धतीने शासकीय सेवेत तत्काळ सामावुन घ्यावे, अशा विविध मागण्यांसाठी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. यावेळी विनोद पाटील यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांना निवेदनही दिले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर बाजू ऐकून घेतली. याबाबत लवकर निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिलेली आहे. २०१४ आणि २०१८ मध्ये मराठा आरक्षणासाठी दोन कायदे करण्यात आले, या कायद्यानुसार भरती प्रक्रियेमध्ये मराठा तरुणांनी भाग घेतला, पण त्यापैकी अनेकांना नियुक्ती मिळाली नाही.
—————–
‘भांबेरी’ उडविणार शिंदे-फडणवीस सरकारची ‘भंबेरी’; मराठा आंदोलनाची ठिणगी भांबेरी गावातून पेटली!