– ग्रामविकास अधिकार्यांसह सीईओला दिले लेखी पत्र
– ग्रामपंचायतीला महापुरूषांच्या जयंती-पुण्यतिथीचाही विसर – उपसरपंच विष्णूमहाराज गाडेकर
चिखली (एकनाथ माळेकर) – तालुक्यातील मुरादपूर ग्रामपंचायतीच्या अनागोंदी कारभारावर खुद्द उपसरपंच विष्णू महाराज गाडेकर यांनी तोफ डागली असून, या ग्रामपंचायतीच्या आर्थिक कारभाराची सविस्तर माहिती लेखी पत्राद्वारे ग्रामविकास अधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांकडे लेखी पत्राद्वारे मागितली आहे. उपसरपंचांच्या पत्राने गावात खळबळ उडाली असून, या ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
सविस्तर असे, की तालुक्यातील मौजे मुरादपूर येथील ग्रामपंचायतीच्या नियोजनशून्य कारभाराची तक्रार आणि माहिती खुद्द मुरादपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच विष्णू महाराज गाडेकर यांनी एका पत्राद्वारे ग्रामविकास अधिकारी मुरादपूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, बुलढाणा यांच्याकडे मागितली आहे. मुरादपूर येथील सन २०२३ पासून झालेल्या कामांची तसेच मासिक सभेची माहिती मागण्यात आली आहे. त्यामध्ये २०२३ पासून ग्रामपंचायतीमध्ये मासिक सभा किती झाल्या? त्या सभेच्या सभेला किती ग्रामपंचायत सदस्य हजर होते? तसेच कोणते ठराव घेण्यात आले? याची माहिती उपसरपंच गाडेकर यांनी मांगितली आहे. तसेच, ग्रामपंचायतीने आतापर्यंत २०२३ पासून २०२५ पर्यंत किती खर्च केला? आणि कुठे खर्च केला? निधी किती जमा आहे? याचीसुद्धा माहिती त्यांनी मागितली आहे. ग्रामपंचायत कार्यालय मुरादपूर येथे कोणत्याही महापुरूषांची जयंती अथवा पुण्यतिथी साजरी झालेली नाही. याचासुद्धा आरोप उपसरपंच विष्णू महाराज गाडेकर यांनी केला. ग्रामपंचायत कार्यालय मुरादपूर येथे महापुरूषांच्या जयंती-पुण्यतिथीचा विसर ग्रामपंचायतीला पडल्याची टीकादेखील विष्णूमहाराज गाडेकर यांनी या पत्राद्वारे केली आहे.