– मराठवाड्यातील पेन्शनधारकांनी उपस्थित राहणाचे आवाहन
– पेन्शनवाढीसह इतर मागण्यांबाबत रणनीती निश्चित होणार
जालना (जिल्हा प्रतिनिधी) – इपीएसधारकांच्या विविध मागण्या व समस्यांवर चर्चा करण्यासाठी जालना परिसरातील इपीएस-९५ धारकांचा भव्य मेळावा बुधवार (दि.२२)रोजी गोल्डी लॉन, योगेशनगर जालना येथे आयोजित करण्यात आलेला आहे, असे जिल्हा अध्यक्ष हरिदास गणपत खेकाळे यांनी कळवले आहे. इपीएस धारकांना सद्या तुटपुंजी पेन्शन मिळत असून, त्यावर त्यांची गुजरान तर सोडाच, शुगर-बीपीची औषधेदेखील भागत नाहीत. इपीएस-९५ योजनेअंतर्गत मिळणार्या तुटपुंजी पेन्शनमध्ये वाढ करण्यात यावी, वैद्यकीय सेवा मोफत मिळाव्यात, यासाठी या आंदोलनात रूपरेषा निश्चित होण्याची शक्यता आहे.
इपीएस-९५ धारकांच्या मराठवाडा युनीटच्यावतीने आयोजित या मेळाव्याबाबत माहिती देताना जालना जिल्हाध्यक्ष हरिदास खेकाळे म्हणाले, की इपीएस-९५ पेन्शनधारकांचा भव्य मेळावा बुधवार दिनांक २२ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता गोल्डी लॉन, भारत पेट्रोलपंपाच्या मागे, योगेशनगर जालना येथे आयोजित करण्यात आला आहे. गेली आठ वर्षे आम्ही आपल्या न्याय्य मागण्यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीच्या बॅनरखाली राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्या नेतृत्वात लढा देत आहोत. अनेकवेळा केंद्र सरकारकडून आश्वासन मिळूनही अद्यापपावेतो न्याय मिळाला नाही. निदान वृद्ध पती-पत्नीला जीवन जगता येईल, एवढे मिनिमम पेन्शन, मोफत मेडिकल सुविधा व वास्तविक वेतनवर उच्च पेंशनची सुविधा आदि मागण्या संदर्भातील घडामोडी जाणून घेण्यासाठी हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राऊत यांच्यासह संघटनेचे राष्ट्रीय तसेच राज्यस्तरीय नेते या मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. तरी मराठवाड्यातील जालना, छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी जिल्ह्यातील इपीएस-९५ पेन्शनधारक यांनी मेळाव्यास जास्त संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही खेकाळे यांनी केले आहे.
देशातील १८४ खाजगी असंघटित क्षेत्रातील ७५ लाख पेन्शनधारकांना (सहकार, जिल्हा बँका, अर्बन बँका, साखर कारखाने, वि.का.सेवा संस्था, दुध संस्था, नागरी पतपेढी, वीज महामंडळ, एसटी महामंडळ, खाजगी दवाखाना, औद्योगिक कारखाने, व प्रसार माध्यमातील कर्मचारी/पत्रकार) आदींना केवळ १००० ते ३५०० रूपये इतकी तुटपुंजी फमिली पेन्शन इपीएस-९५ योजनेअंतर्गत मिळत आहे. पेन्शनधारकांनी नोकरी कालावधीत दरमहा ४१७/-,५४१/-,१२५० रूपये अंशदान पेन्शन फंडात जमा केलेले आहे. प्रत्येक कामगारांची किमान ३० ते ३५ वर्षे सेवा झालेली आहे व त्यांचे सेवा काळामध्ये किमान २० लाख रुपये तरी अंशदान जमा झालेले आहे. यांना त्यांचे अंशदानावरील व्याजरूपी पेन्शनदेखील मिळत नाही. असे बाहेर व्याजावर पैसे ठेवले असते तरी त्यांना सध्या मिळणार्या पेंन्शनपेक्षा जास्त व्याज मिळाले असते. असे असतानादेखील त्यांना तुटपुंजी पेन्शन मिळत आहे. त्यावर त्यांची गुजरान तर सोडाच शुगर बीपीची औषधेदेखील भागत नाहीत. इपीएस-९५ योजने अंतर्गत मिळणारी तुटपुंजी पेन्शन कमीत कमी ७५०० रूपये व महागाईभत्ता, वैद्यकीय सेवा मोफत आदी मागण्या करिता राष्ट्रीय संघर्ष समितीचे गेली ८ वर्षेपासून केंद्र सरकार, प्रा.फंड कार्यालयाशी पाठपुरावा करीत, आंदोलन, उपोषण, रस्ता रोको, मान्यवरांच्या गाठीभेटी निवेदन देणे याद्वारे प्रयत्न चालू आहेत. याच आंदोलनाची पुढील रूपरेषा जालना येथील मेळाव्यात निश्चित केली जाणार आहे.
———–