– कुंभमेळ्यात शाहीस्नान केले, नदीतून बाहेर आले आणि मृत्यूने गाठले!
– सोलापूर शहरावर शोककळा, विशेष विमानाने येणार मृतदेह
– मुरारजी पेठेतील ‘राधाश्री’ निवासस्थानी होणार अंत्यदर्शन; विविध मान्यवरांच्या उपस्थितीत होणार अंत्यसंस्कार
सोलापूर (हेमंत चौधरी) – सोलापूरचे माजी महापौर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते महेश कोठे ‘अण्णा’ यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने प्रयागराज येथील कुंभमेळ्यात निधन झाले आहे. वयाच्या ५५ व्यावर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुंभमेळ्याच्या निमित्ताने ते प्रयागराजला गेले होते. त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने सोलापूर शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. कुंभमेळ्यात शाहीस्नान केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला, त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले, परंतु त्यांची प्राणज्योत मालवली होती. ज्येष्ठ नेते शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून महेश कोठे यांची ओळख होती. आज त्यांचे पार्थिव विशेष विमानाने आणले जाणार असून, ‘राधाश्री’ मुरारजी पेठेतील राघवेंद्र नगर येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवले जाणार आहे. उद्या सकाळी 11 वाजता अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदारकीची निवडणूक लढवली होती. सोलापूर महापालिकेमध्ये त्यांच्या नावाचा मोठा दबदबा होता.
प्रयागराज येथे आज सोमवारपासून कुंभमेळ्याला सुरूवात झाली. या कुंभमेळ्यासाठी महेश कोठे आपल्या काही मित्रांसोबत गेले होते. मंगळवारी सकाळी शाहीस्नान करण्यासाठी गेले. स्नान करून बाहेर पडल्यानंतर थंडीमुळे त्यांचे रक्त गोठले आणि त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना तातडीने रूग्णालयात हलविण्यात आले, परंतु त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. शाहीस्नान पर्वावर आणि तीर्थस्थळी त्यांना मृत्यू प्राप्त झाला असला तरी, सोलापूर शहरात मात्र प्रचंड हळहळ व्यक्त होत होती. महेश कोठे यांचे सोलापुरातील राजकारणात मोठे प्राबल्य होते. ते सोलापूर महापालिकेतील सर्वात तरूण महापौर होते. शिवसेनेला राम राम केल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादीमध्ये जाण्यापूर्वी ते सोलापूर महापालिकेचे विरोधी पक्षनेतेदेखील होते. सध्या महेश कोठे यांचे नातू आमदार आहेत. यंदाच्या सोलापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांचा पराभव झाला होता. ज्येष्ठ नेते शरद पवार व माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे अतिशय निकटवर्तीय म्हणून महेश कोठे यांची ओळख आहे. पद्मशाली ज्ञाती संस्थेचे प्रमुख म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. शहराच्या राजकारणातील एक धुरंधर नेता हरपल्याची संवेदना सर्वपक्षीय नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुले, मुलगी, नातू असा परिवार आहे. माजी नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे ते वडील असून, नूतन भाजप आमदार देवेंद्र कोठे यांचे ते चुलते होते. त्यांचा मृतदेह प्रयागराज येथून विशेष विमानाने सोलापूरला आणला जाणार असून, त्यानंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील.
महेश कोठे हे प्रयागराज (काशी) येथे त्यांच्या काही मित्रांसोबत कुंभमेळ्याच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेले होते. नदीमध्ये शाहीस्नान करून ते बाहेर पडले. थंडीमुळे रक्त गोठल्याने त्यांना हृदयविकाराचा जोरदार झटका आला. रूग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. विष्णूपंत उर्फ तात्या कोठे यांचे महेश कोठे हे पुत्र असून, तात्या कोठे यांच्यापासून सोलापूर महानगरपालिकेवर तीस वर्षाहून अधिक काळ कोठे घराण्याचे वर्चस्व होते. कोठे बोले आणि महापालिका हाले, असे वाक्य त्यांच्या बाबतीत अनेक जण बोलत असत. नगरसेवक प्रथमेश कोठे यांचे ते वडील होत. तर शहर मध्यचे नूतन आमदार देवेंद्र कोठे यांचे ते काका होते. महेश कोठे यांचे पार्थिव विशेष विमानाने सोलापुरात आणले जात असून, राज्यातील दिग्गज नेते आमदार, खासदार यावेळी उपस्थित राहणार आहेत.
———–