– केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी मांडला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रस्ताव!
बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्यात स्वतंत्र आयुष मंत्रालय आणि विद्यापीठ निर्माण करावे, तसेच इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातील शासकीय कर्मचार्यांना आणि सेवानिवृत्त कर्मचार्यांना अॅलोपॅथीसोबतच आयुर्वेदिक उपचारही मोफत मिळावेत, असा प्रस्ताव केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मांडला आहे.
केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव हे ८ जानेवारीला मुंबई दौर्यावर असतांना त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांनी विविध विषयांवर चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये आयुष मंत्रालयाची स्थापना करुन देशात आयुर्वेद उपचार पध्दतीला नवीन दालन उपलब्ध करुन दिले आहे. देशातील नागरिकांचे आरोग्य निरोगी राहण्याच्या दृष्टीकोनातून हर घर आयुर्वेद उपक्रमाअंतर्गत केंद्र सरकारच्यावतीने विविध उपक्रम आणि उपचार पध्दती संदर्भाची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे काम करण्यात येत आहे. आयुर्वेदिक उपचार पध्दतीला देशातील नागरिकांचाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्यासाठी नवीन स्वतंत्र मंत्रालयाची आणि आयुष विद्यापीठाची निर्मिती करण्यात यावी, या संदर्भांचा प्रस्ताव त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला.
आयुष मंत्रालयाच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य, संशोधन, तंत्रज्ञान, शिक्षण, जागतिकीकरण आणि गुणवत्ता वाढीसाठी भरीव काम करण्यात येत आहे. देशाअंतर्गत आयुर्वेद उपचार पध्दतीचा स्विकार नागरिक करु लागले आहे. महाराष्ट्रातील लोकही प्राचीन आयुर्वेद उपचार पध्दतीचा अवलंब करत असल्याने आयुर्वेदाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीकोनातून स्वतंत्र आयुष मंत्रालय किंवा आयुष विभाग स्थापन करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचार्यांना राज्यस्थान दिल्ली व अन्य राज्यामध्ये मधुमेह, मूळव्याध, त्वचारोग, व इतर आजारांवर अॅलोपॅथीसोबतच आयुर्वेद उपचार मोफत मिळतो. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील शासकीय कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचार्यांना मोफत आयुर्वेद उपचार मिळावा, असा प्रस्तावही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी मांडला. या प्रस्तावासंदर्भांत मुख्यमंत्री आणि केंद्रीय आयुषमंत्री यांच्या विचारविमश होवून लवकरच योग्य निर्णय घेण्याचे आश्वासन फडणवीस केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांना दिले. यावेळी आमदार संजय कुटेही उपस्थित होते.