– युवा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या चौकशीसाठी सरकारकडून एसआयटीची स्थापना
– वाल्मीक कराडांना १४ दिवसांची पोलिस कोठडी; तपासाचे सीआयडी अधिकार्यांसमोर आव्हान!
बीड (खास प्रतिनिधी) – केज तालुक्यातील मस्साजोगचे युवा सरपंच संतोषबापू देशमुख यांच्या निर्घृण हत्याकांडाशी निगडीत खंडणी प्रकरणात पोलिसांना हवे असणारे वाल्मीक कराड हे मंगळवारी सीआयडीला शरण आल्यानंतर त्यांची बीड शहर पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीमुळे प्रकृती बिघडल्यामुळे रात्री त्याच्यावर ऑक्सिजन लावण्याची वेळ आल्याची माहिती हाती आली आहे. त्यांना पोलिस अधिकारी आपला खाक्या तर दाखवत नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने चर्चेत आला आहे. कराड यांना १४ दिवसांची इतकी प्रदीर्घ पोलिस कोठडी देण्यात आली असून, याचसोबत या हत्याकांडातील इतर आरोपींचा शोध घेणेदेखील सुरू आहे. दुसरीकडे, राज्य सरकारने या प्रकरणाच्या सखोल तपासासाठी वरिष्ठ आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली, पोलिस उपमहानिरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सीआयडी, पुणे यांच्या नेतृत्वात एसआयटी स्थापन केली आहे.
वाल्मीक कराड हे मंगळवारी पुण्यातील सीआयडी कार्यालयात शरण आले होते. त्यानंतर त्यांना रस्तेमार्गाने बीडच्या केज येथे आणण्यात आले. तिथे रात्रीच कोर्टापुढे हजर केल्यानंतर त्यांच्या चौकशीला सुरूवात झाली. बीड शहर पोलिस ठाण्यातील एका बंद खोलीत कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सीआयडीचे अधिकारी त्यांची चौकशी करत आहेत. सीआयडीने या प्रकरणी आरोपी सुदर्शन घुले याच्या दोन भावांनादेखील चौकशीसाठी बोलावले होते. सीआयडीचे अधिकारी मंगळवारी रात्री ९.३० च्या सुमारास वाल्मीक कराड यांना घेऊन केजला पोहोचले. त्यानंतर ११.३० च्या सुमारास त्यांना केजस्थित न्यायालयापुढे हजर करण्यात आले. यावेळी न्यायाधीशांनी कराड यांना पोलिसांविरोधात काही तक्रार आहे का? असा प्रश्न केला. त्यावर त्यांनी नाही असे प्रत्युत्तर दिले. त्यानंतर मध्यरात्री १.३० च्या सुमारास त्यांना बीड शहर पोलिस ठाण्यात आणण्यात आले. तिथे पुन्हा त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी आपल्याला श्वसनाचा त्रास होत असल्याची तक्रार केली. यामुळे कराड यांना तात्पुरते ऑक्सिजन लावण्यात आले. रक्तातील साखर वाढल्यामुळे त्याच्यावर ही वेळ आल्याची माहिती आहे. दरम्यान, कराड यांच्या अटकेनंतर बीड जिल्ह्यातील सामाजिक ध्रुवीकरण वाढले असून, एक मोठा समाज या अटकेविरोधात संताप व्यक्त करताना दिसून येत आहे.
दुसरीकडे, आयपीएस अधिकारी बसवराज तेली यांच्या नेतृत्वात राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली असून, तेली यांच्यासह १० जणांची टीम या घटनेचा सखोल तपास करणार आहे. त्यामुळे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात लवकरात लवकर तपास लागणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. युवा सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी केज पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल आहे.
युवा सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाच्या चौकशी व तपासासाठी आयपीएस अधिकारी डॉ. बसवराज तेली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेली एसआयटी आपल्या कामाला लागली आहे. यात पोलिस उपअधीक्षक अनील गुजर, सहाय्यक पोलिस निरीक्षक विजयसिंग जोनवाल, पोलिस उपनिरीक्षक महेश विघ्ने, पोलिस उपनिरीक्षक आनंद शिंदे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक तुळशीराम जगताप, पोलिस हवालदार मनोज वाघ, पोलिस नाईक चंद्रकांत काळकुटे, पोलिस नाईक बाळासाहेब अहंकारे, पोलिस शिपाई संतोष गित्ते अशा अधिकार्यांचा समावेश आहे.