– चिखलीत रविवारी मराठा वधु-वर पालक बैठकीचे आयोजन
– ५ जानेवारीच्या बुलढाण्यातील वधु-वर परिचय मेळाव्याचे केले जाणार नियोजन
चिखली (एकनाथ माळेकर) – बुलढाणा येथील नियोजित दि. ५ जानेवारी २०२५ रोजी होऊ घातलेल्या सकल मराठा समाजाच्या वधु-वर परिचय मेळाव्याच्या आयोजन व नियोजनासंदर्भात नियोजन करता यावे म्हणून अशोकराव चौधरी यांच्या निवासस्थानी बीडीसीसी बँकेच्यासमोर चिखली तालुक्यातील सकल मराठा समाजातील वधु-वर पालकांची महत्त्वपूर्ण बैठक रविवारी (दि.२९) चार वाजता आयोजित करण्यात आलेली आहे. बैठकीला महाराष्ट्र मराठा सोयरीकचे संकल्पक सुनील जवंजाळ, महिला सोयरीक संघाच्या जिल्हाध्यक्षा पत्रकार सुरेखाताई सोमनाथ सावळे, डॉक्टर संजीवनीताई शेळके, नारायणराव मिसाळ व मान्यवर मंडळी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन सामाजिक कार्यकर्ते डॉ.सत्येंद्र भुसारी, माधवराव जपे, नंदूभाऊ सवडतकर, अरविंद देशमुख, पंढरीनाथ सुसर यांनी केले आहे.
विवाह जुळून येणे ही एक मोठी समस्या झाली आहे. सर्वच जाती समाज घटकातील तरुणांपुढे आज लग्न ही मोठी समस्या आहे. अशा वेळी ही सामाजिक समस्या हेरून महाराष्ट्र मराठा सोयरीक या लोक चळवळीचे संकल्पक सुनील जवंजाळ पाटील यांनी राज्यभर प्रयत्न सुरू केले आहे. राजकारण विरहित कार्य त्यांनी गेल्या कितीतरी वर्षापासून सुरूच ठेवले आहे. त्यांच्या अथक प्रयत्नातून सदर चळवळ ही राज्याबाहेर पोहोचून इतर राज्यातसुद्धा वधु-वर परिचय मेळावे संपन्न झालेले आहेत. समाज घटकातील सर्वच मुला-मुलींना योग्य स्थळ मिळावे, यासाठी त्यांचा प्रयत्न नावीन्यपूर्ण ठरला आहे. बुलढाणा जिल्ह्यातही गेल्या तीन वर्षांपासून अशा प्रकारच्या वधु-वर परिचय मेळाव्याचे आयोजन यशस्वीरित्या केल्या जात आहे. आणि अनेक अनुरुप विवाहेच्छूक जोडप्यांचे विवाह जुळून आले आहेत. बीड, रायगड, कोल्हापूर, जालना, छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) अहमदनगर, लातूर, सोलापूर, जिल्ह्यामध्ये वधु-वर परिचय मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
चिखली येथील बैठकीला उपस्थित राहताना पालकांनी आपल्या पाल्यांचे बायोडाटा व फोटो सोबत आणावे. बैठक संपूर्णतः सामाजिक असेल. बैठकीमध्ये बुलढाणा शहरामध्ये लवकरच होऊ घातलेल्या वधु-वर परिचय मेळाव्यासंबंधी प्रचार प्रसार व नियोजन यासंदर्भात विचारविनिमय करण्यात येणार आहे. तरी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते व पालकांनी या बैठकीस उपस्थित रहावे, आणि दि. ५ जानेवारीरोजी होणार्या वधु-वर परिचय मेळाव्यासही मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.