– चेके व कणखर परिवाराने समाजासमोर घालून दिला आदर्श!
सिंदखेडराजा (अनिल दराडे) – लग्नकार्य सोहळा म्हटलं की आनंदच मोठा असतो. पण आजकाल आनंद व्यक्त करताना सामाजिक भान हरपत चालले आहे. मात्र देऊळगावराजात कर्णकर्कश आवाजाच्या डीजे, डॉल्बीला फाटा देत वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा माऊली तुकाराम जयघोष, भजनाने लग्न सोहळा पार पडला. चेके व कणखर परिवाराच्या या विवाह सोहळ्याची तालुक्यात सद्या एकच चर्चा होत आहे. तहसील कार्यालयात कार्यरत असलेले मनोहर भिकाजी चेके यांचे चिरंजीव विशाल व चि. सौ. कां. प्रिया यांच्या विवाह सोहळ्यात हा स्तुत्य उपक्रम पहायला मिळाला.
हौसेला मोल नसते म्हणतं गावदेव, लग्नकार्य, वरातीसह इतर कार्यक्रमात डॉल्बी व इतर कर्णकर्कश आवाजाची वाद्य वापरून आनंद साजरा करण्यावर भर दिला जातो. मात्र या कर्णकर्कश डॉल्बीच्या आवाजामुळे सर्वसामान्य नागरिकांना, अबाल वृध्दांना त्रास होतो. आणि यावरच तरुणाई थयथयकरुन झिंगत असल्याचे दिसून येत आहे. मात्र देऊळगावराजा येथे चिखली रोडवरील दगडवाडी फाटा येथील पंकज लॉन्स येथे चेके परिवार व कणखर परिवाराच्यावतीने पार पडलेल्या विवाह सोहळ्यात कर्णकर्कश आवाजाच्या डॉल्बीसह इतर आवाजाच्या वाद्यांना फाटा देत, वारकरी संप्रदायाच्या टाळ मृदंगाचा गजर पाहायला मिळाला. मनोहर भिकाजी चेके, सरंबा हल्ली मुक्काम देऊळगावराजा यांचे चिरंजीव विशाल व अनिल माधवराव कणखर, रा. मेंडगाव हल्लीमुक्काम देऊळगावराजा यांची कन्या प्रिया यांचा विवाह सोहळा वारकरी संप्रदयाप्रमाणे मंगळवार (दि.२४ डिसेंबर) रोजी पार पडला. पंकज लॉन्स, चिखली रोड देऊळगावराजा येथे पार पडलेल्या या अनोख्या सोहळ्याची मात्र तालुक्यात चांगलीच चर्चा होत असून, चेके व कणखर परिवाराचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे.
डीजेविरहित या लग्न सोहळ्याचा डीजेच्या दणदणाटाऐवजी भजनी मंडळी होती. टाळ-मृदंगाच्या निनादात हा सोहळा पार पडला. या विवाह समारंभाला आमदार मनोज कायंदे, व सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी संजय खडसे, माजी मंत्री व माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. नाझेर काझी, तहसीलदार अजय दिवटे, नायब तहसीलदार डॉ.वराडे, सिंदखेडराजा महसूल विभागातील संजय सोनुने व मंडळ अधिकारी, तलाठी, नातेवाईक उपस्थित होते. यावेळी भजनी मंडळाने टाळ मृदुंगाच्या गजरात ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ जयघोष व भजनाने वर्हाडी मंडळी, पै-पाहुण्यांचे आदरातिथ्य केले.