– आमदार मनोज कायंदे यांची रामनगर येथील जलपूजन कार्यक्रमातून ग्वाही
– खडकपूर्णा टप्पा क्रमांक एक ते चारचे आ. मनोज कायदेंसह भारतभाऊ बोंद्रे, अंकुशराव पडघान यांच्याहस्ते जलपूजन
देऊळगाव घुबे (राजेंद्र घुबे) – सिंदखेडराजा मतदारसंघातील चिखली तालुक्यातील २२ गावांतील शेतकर्यांना जीवनवाहिनी बनविणार्या खडकपूर्णा धरणाच्या उपसा सिंचन टप्पा क्रमांक एक ते चारच्या पाण्याचे जलपूजन बुलढाणा जिल्हा जलक्रांतीचे प्रणेते माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे व सिंदखेडराजा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायदे यांच्याहस्ते आज दि. २६ डिसेंबररोजी दुपारी एक वाजता रामनगर येथे पार पडले. शेवटच्या टोकावरील या गावांत विकासासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही. तसेच, ज्या भागात काही अडचणींमुळे पाणी पोहोचले नाही, त्या अडचणी दूर करून पाणी पोहोचवू व त्यासाठी लवकरच बैठक लावू, अशी ग्वाहीही याप्रसंगी आ. कायंदे यांनी दिली.
यावेळी बोलताना आमदार मनोज कायंदे यांनी सांगितले, की मतदारसंघाच्या शेवटच्या टोकावर जरी आपली गाव असली तरी तरीही आपण कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही व बर्याच वर्षापासून खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी हे आपल्या परिसरातील टप्पा क्रमांक एक ते चारद्वारे सुरू असून, त्यामध्ये बर्याच अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे बर्याच भागांमध्ये पाणी अजूनही पोहोचले नाही. त्यासाठी देऊळगाव घुबे येथील माझे जेष्ठ मार्गदर्शक आमचे काका शेणफडराव घुबे व भाजपनेते अंकुशराव पाटील व यांच्यासोबतच परिसरातील पाणी वाटप संस्थांचे पदाधिकारी आणि प्रकल्पाचे अधिकारी यांची लवकरच एक बैठक आयोजित करून आपण पुढील नियोजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करू, असे आश्वासन याप्रसंगी आ. कायंदे यांनी दिले.
याप्रसंगी उपस्थितांमध्ये बुलढाणा जिल्हा जलक्रांतीचे शिल्पकार माजी मंत्री भारतभाऊ बोंद्रे, चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले यांचे वडील अंकुशराव पडघान, इरफान अली प्रदेश सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष अॅड.नाझेर काझी, उपाध्यक्ष मनोज दा़ंडगे, भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते शेणफडराव घुबे, राष्ट्रवादी जिल्हा कार्याध्यक्ष शंतनू बोंद्रे, परिसरातील गावांतील पाणी वापर संस्थाचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी, पाटबंधारे विभागाचे अभियंता व कर्मचारी व शेतकरीवर्ग उपस्थित होता. या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन रामनगर येथील राजेंद्र भगत व ग्रामस्थांनी करून उपस्थितांची भोजनाची व्यवस्थादेखील केली होती.