– बीडमध्ये बहीणभावात संघर्ष; धनंजय मुंडेंना वाल्मिक कराडांशी सलगी भोवणार?
– संजय शिरसाट, भरत गोगावले म्हणतात आमचेच फिक्स; नाशिकमध्ये भुजबळांना शह देण्यासाठी कोकाटेंना ‘बळ’!
– बुलढाण्यासाठी आकाश फुंडकर फिक्स?; गुलाबराव पाटील, संजय शिरसाट व अतुल सावेही चर्चेत!
मुंबई/बुलढाणा (बाळू वानखेडे) – मंत्रीपदावरून महायुतीतील खदखद शांत होत नाही तोच, आता पालकमंत्री पदासाठीदेखील जोरदार ओढाताण सुरू असल्याची विश्वसनीय माहिती हाती आली आहे. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी पंकजा मुंडे व धनंजय मुंडे या बहीणभावाचा संघर्ष जोरावर असून, वाल्मिक कराड यांच्याशी असलेली सलगी धनंजय मुंडे यांना भोवणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तिकडे शिवसेना शिंदे गटाचे संजय सिरसाट, भरत गोगावले हे आमचे पालकमंत्रीपद फिक्स असल्याचे जाहीरपणे सांगत सुटले असल्याचे दिसून येते. बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जिल्ह्यातीलच मंत्री आकाश फुंडकर यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता असली तरी, येथे मंत्री संजय सिरसाट, गुलाबराव पाटील, अतुल सावे यांच्याही नावाची चर्चा महायुतीच्या वर्तुळात आहे. तिकडे छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी अजित पवार यांनी नाशिकमध्ये माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदाचे ‘बळ’ दिले असून, त्यांचीच पालकमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. तर पालकमंत्री जिल्ह्यातीलच द्यावा, अशी मागणी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केली आहे. येत्या तीन महिन्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्याबाबत ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर त्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमादरम्यान बोलताना दुजोरा दिला आहे. त्यामुळे या निवडणुकीच्या दृष्टीनेही पालकमंत्री पद महत्त्वाचे आहे.
रखडलेला मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर तसेच सुधीर मुनगंटीवार, छगन भुजबळ, संजय कुटे यांच्यासह ज्येष्ठांना डावलण्याने व ‘खाते’ वाटपातील नाराजीमुळे अंतर्गत खदखद धुमसत ुअसतानाच, आता महायुतीत पालकमंत्री पदासाठीही जोरदार ओढाताण सुरू असल्याची चर्चा आहे. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी मंत्री धनंजय मुंडे व पंकजा मुंडे या बहीणभावात संघर्ष सुरू असल्याची विश्वसनीय माहिती असून, येथील संतोष देशमुख यांच्या खूनप्रकरणी संशयाच्या भोवर्यात असलेले वाल्मिक कराड यांच्याशी असलेली सलगी धनंजय मुंडे यांना चांगलीच भोवणार असल्याचे दिसते आहे. त्यातच धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाला येथे विरोधदेखील होत आहे. तिकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अतुल सावे व संजय सिरसाट हे दोन मंत्री असले तरी येथे संजय सिरसाट हे आपण फिक्स पालकमंत्री असल्याचे सांगतात, तर रायगडमध्ये आदित्य तटकरे व भारत गोगावले हे मंत्री असून, येथे भरत भोगावलेंचे फिक्स पालकमंत्री असे बॅनरदेखील झळकत आहेत. सातार्यात शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभुराज देसाई व मकरंद पाटील या चार जणांना मंत्रिपद मिळाले असले तरी, येथे शिवेंद्रसिंहराजे यांनाच पालकमंत्री करा, अशी मागणी उदयनराजे भोसले यांनी केली आहे. नाशिकमध्ये दादा भुसे, माणिकराव कोकाटेसह तिघे मंत्री असून, येथे छगन भुजबळ यांना शह देण्यासाठी माणिकराव कोकाटे यांना ‘बळ’ देत अजित पवारांनी मंत्री केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असतानाच, त्यांचीच पालकमंत्रीपदी वर्णी लागणार असल्याची माहिती आहे. असाच काहीसा वाद पुणे, कोल्हापूर, नागपूर, यवतमाळसह इतरही जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीत धुमसत असल्याचे दिसून येते.
बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी जिल्ह्यातीलच मंत्री असलेले आकाश फुंडकर यांचे नाव निश्चित असल्याचे मानले जात असले तरी, जळगावच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन यांची नियुक्ती जवळपास निश्चित असल्याचे सांगितले जात असून, असे झाल्यास गुलाबराव पाटलांना बुलढाण्याचे पालकत्व दिल्या जावू शकते. पण याअगोदर पालकमंत्री असताना त्यांनी बुलढाणा जिल्ह्याकडे साफ दुर्लक्ष केले होते, हेही विसरून चालणार नाही. अशीच काहीशी परिस्थिती छत्रपती संभाजीनगरची असून, येथे अतुल सावे यांना पालकमंत्री दिल्यास संजय सिरसाट यांना बुलढाण्याची जबाबदारी दिली जाऊ शकते. कारण नजीकच्या जालना जिल्ह्यातून अतुल सावे यांना पालकमंत्री करण्यास शिवसेनेचा तीव्र विरोध असल्याचे दिसून येत आहे. असे झाल्यास आकाश फुंडकर यांना अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री केल्या जावू शकते. विशेष म्हणजे, त्यांचे वडिल स्व.भाऊसाहेब फुंडकर हे अकोला लोकसभेचे खासदार राहिले आहेत.