– युवा सेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकरांसह शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन करताच पाटबंधारे विभाग वठणीवर!
– कार्यकारी अभियंता २५ तारखेला करणार ‘ऑन दी स्पॉट’ पाहणी; भुतेकरांनी आंदोलन तूर्त केले स्थगित!
देऊळगावराजा (एकनाथ माळेकर) – निव्वळ पाटबंधारे विभागाच्या अक्षम्य गलथान कारभारामुळे खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी टप्पा क्रमांक तीनच्या कालव्याद्वारे शेळगाव आटोळ, आंचरवाडी, मिसाळवाडी, डोडरा, मंडपगाव, इसरूळ शिवारातील शेतकर्यांना मिळत नाही. या भागातील पाटाची दुरवस्था झाली असून, काही शेतकर्यांनी पाटाचे काम अडवून धरले असले तरी, त्यांच्या मागण्या जाणून घेण्याची तसदीदेखील अधिकारी घेत नाहीत. त्यामुळे शिवसेना युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर यांनी शेतकर्यांसह देऊळगावराजा येथील लघु पाटबंधारे विभाग कार्यालय येथे ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतु, कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी आंदोलकांशी चर्चा करून हा प्रश्न समजावून घेतला व २५ तारखेला ऑन दी स्पॉट जाऊन चौकशी करू व हा प्रश्न सोडवू, असे तोंडी आश्वासन दिल्यानंतर भुतेकर व शेतकर्यांनी पाटबंधारे विभागाला सहकार्य करण्याची भूमिका घेत, तूर्त आपले ठिय्या आंदोलन स्थगित केले.
सविस्तर असे, की लघु पाटबंधारे विभाग देऊळगावराजा या ठिकाणी कालवा टप्पा क्रमांक तीनवरील शेळगाव आटोळ, आंचरवाडी, डोडरा, मंडपगाव, इसरूळ शिवारातील पाण्याच्या प्रतीक्षेत असणार्या शेतकर्यांसमवेत शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख संतोष भुतेकर व शेतकर्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले होते. हे आंदोलन करत असताना शेतकर्यांची मागणी होती, की गेल्या बारा वर्षांपासून पाटाचे काम हे प्रलंबित आहे. टप्पा क्रमांक तीनच्या मुख्य पाटाचे काम तर दोन ठिकाणी शेतकर्यांनी अडवले आहे. परंतु त्यांच्या अडचणी ह्या प्रशासनाने जर समजून घेतल्या तर त्या सुटण्यासारख्या आहेत. प्रशासनाने त्यामध्ये पुढाकार घेतला तर संबंधित शेतकरी ऐकण्यास तयार आहे. मग प्रशासन का समोर येत नाही. शिवाय, इतर ठिकाणी जिथे अडचणी नाहीत, अशा ठिकाणच्या चार्यासुद्धा प्रशासन का पूर्ण करू शकले नाही? जिथपर्यंत पाटाचे काम पूर्ण आहे, तिथपर्यंत शासन का पाणी सोडत नाही? पाणी सोडण्याच्या अगोदर पाटाची स्वच्छता का केली गेली नाही? अशा एक ना अनेक प्रश्नांची उत्तरे मागण्यासाठी सर्वजण लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर ठाण मांडून बसले. शेतकर्यांचा संताप ऐकून व आंदोलनावर ठाम असल्याची भूमिका पाहून उपस्थित संबंधित अधिकारी व कार्यकारी अभियंता प्रशांत संत यांनी आंदोलकांशी संपर्क साधत, सर्व बाबी समजून घेतल्या. ज्या ज्या ठिकाणी प्रशासन कमी पडते आहे त्या त्या ठिकाणी लगेच कार्यवाही करण्याचे ठरवले. खरे तर आंदोलनकर्त्यांच्या भूमिकेसमोर अधिकार्यांना काय बोलावे, त्यांचे उत्तरच त्यांच्याकडे नव्हते? सर्व परिस्थिती लक्षात घेऊन कार्यकारी अभियंता संत यांनी आंदोलनकर्त्यांचा आग्रह लक्षात घेऊन आपण दि. २५ डिसेंबरोजी सकाळी दहा वाजता संबंधित काम रखडलेल्या ठिकाणी येऊ व समस्या जाणून घेऊ, असे सांगितले. आंदोलनकर्त्यांनीदेखील दूध का दूध व पाणी का पाणी करून देण्याचे स्पष्ट करत, ज्या शेतकर्यांनी जमीन अडवल्याचे प्रशासन सांगत होते, त्यांच्याशी संपर्क करून तसे काहीही नाही. संबंधित शेतकरी जमीन देण्यास तयार आहेत, कुठेतरी शासनाच्या अडचणीमुळे संबंधित शेतकरी अडून बसले आहेत, अशा शेतकर्यांशी समन्वय करून त्यांच्या अडचणी सोडून लगेच तात्काळ पाटाच्या कामाला सुरुवात करू. चार्यासुद्धा पूर्ण करू व सदर कालव्याला सध्या एकच पंप चालू असला तरी उद्या दुसरा पंप चालू करून शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्याचा प्रयत्न करू, असे तोंडी आश्वासनदेखील अभियंता संत यांनी आंदोलकांना याप्रसंगी दिले. त्यामुळे सकाळी ११ वाजेपासून सुरू झालेले ठिय्या आंदोलन दुपारी चार वाजता तूर्तास थांबण्याचा निर्णय आंदोलनकर्त्यांनी घेतला, व प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घेतली. मात्र आमची मागणी जर पूर्ण झाली नाही तर आम्ही पुन्हा आक्रमक आंदोलनाचा पवित्रा घेऊ, असा इशारा शिवसेना नेते व इसरूळचे माजी सरपंच संतोष भुतेकर यांनी संबंधित अधिकार्यांना दिला आहे.
वर्षातून तीन वेळेस पाणी सोडण्याचे नियोजन असताना आता दुसर्यांदा पाणी सोडायची वेळ झाली असली तरी अजून पहिलेच पाणी शेतकर्यांच्या शेतापर्यंत पोहोचले नाही. तुरीला पाणी बसेल या आशेने शेतकरी पाण्याची वाट पाहत होता. तूर गेली, हरभरा गेला, ज्वारीचे पीक उभ्या उभे वाळून गेले. पाण्याची वाट पाहत पाहत अजूनपर्यंत पाणी नाही. मिसाळवाडी, शेळगाव आटोळ, डोडरा शिवारामध्ये पंधरा दिवस झाले पाणी सुटून अजून पाणी पोहोचले नाही. पाटामध्ये प्रचंड झाडझुडपं, दगड अनेक ठिकाणी पाटांची गळती या सर्व गोष्टी उघडपणे पडून आहेत. जर खडकपूर्णा प्रकल्पातून शेतकर्यांना पाणी देण्यासाठी तीन विभाग शासनाने नेमून दिले आहेत. पहिला धरणाची निगा राखून शेतकर्यांना पाणी देण्याचे नियोजन करणारा विभाग, दुसरा मोटरपंप व पाटाची दुरुस्ती करणारा, तर तिसरा या सगळ्यांचा समन्वय ठेवणारा. असे सर्व असताना शेतकर्यांना वेळेवर पाणी पोहोचत नाही. वेळेवर यांची पंप जळतात कशी? छाेट्या-मोठ्या तांत्रिक अडचणी यांना अगोदर का दुरूस्त करता येत नाही? शासनाच्या गाड्या, बंगले, ऑफिस, बलाढ्य पगार इतका सगळा लाभ घेणारे हे अधिकारी नेमकं करतात काय? खरंच पाट पूर्ण होतील का? चार्या पूर्ण होतील का? पश्चिम महाराष्ट्रात जसं पाटाचं झुळझुळवाणी पाणी शेतकर्यांच्या शेतामध्ये वाहत जाऊन शेतकर्यांना सुजलाम सुफलाम बनवल.ं तसं आमचं होईल का? होईल तर कधी? अशी भावनिक साद संतोष भुतेकर यांनी अधिकार्यांकडे घातली आहे. यावरच न थांबता सर्व कामे नीट व्यवस्थित जोपर्यंत तुम्ही करत नाही, तोपर्यंत तुमचा पिच्छा सोडण्याचा इशाराही संतोष भुतेकर यांनी व शेतकर्यांनी प्रशासनाला दिला आहे. पाटबंधारे विभागाच्या कामचुकार कर्मचार्यांमुळेच ही परिस्थिती उदभवली असल्याचे दिसून येत असून, या कर्मचार्यांची चौकशी करून कामचुकारांना तत्काळ निलंबीत करण्यात यावे, अशी मागणीही शेतकरीवर्गातून पुढे आली आहे.
—————-